Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडअनेक आजारांवर मात करण्यासाठी गणेशोत्सव काळात " रक्तदान शिबिरे " घेणे काळाची...

अनेक आजारांवर मात करण्यासाठी गणेशोत्सव काळात ” रक्तदान शिबिरे ” घेणे काळाची गरज !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात धावपळीच्या जीवनात व सभोवतालच्या वातावरणामुळे तरुणांना तसेच वयोवृध्द नागरिकांना नवनवीन आजारांना सामोरे जावे लागत आहे. या आजारांच्या होणाऱ्या खर्चामुळे व त्रासामुळे नागरिक त्रस्त होऊन त्यांचे कुटुंबच उध्वस्त होताना दिसत आहेत . त्यातच आता ऊन व पावसाच्या कोंदटपणाने डेंग्यू , मलेरिया या आजारांना सामोरे जावे लागत आहे .
म्हणूनच प्रथमदर्शनी सावधगिरी बाळगल्यास अशा आजारांना सामोरे जावे लागणार नाही . यासाठी रक्तदान शिबिरे आयोजित केल्यास यावर आपण मात करू शकतो . नेहमीच १५ दिवसांनी रक्त चढवणारे ” थैलेसिमीया ” या आजाराचे रुग्ण असताना आता डेंग्यू – मलेरिया या रुग्णांना रक्त व त्यातील अविभाज्य घटक असलेले रक्ताची गरज भासत असल्याने , कमी पडत असलेल्या रक्ताची तूट भरून काढण्यासाठी येणाऱ्या गणेशोत्सवात राजकीय पक्ष , मंडळे, सामाजिक संघटना यांनी या आजारांवर मात करण्यासाठी व रुग्णांना सुखकर आयुष्य जगण्यासाठी रक्तदान शिबिरे आयोजित करावीत , असे भावनिक आवाहन कर्जत तालुक्यातील सार्वजनिक रक्तदाते , रायगड भूषण राजाभाऊ कोठारी सर यांनी केले आहे.

कर्जत तालुक्यात सध्या डेंग्यू , मलेरिया सारख्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे . डेंग्यू व मलेरिया या आजारामुळे अनेक रुग्णांचे प्लेटलेट्स खूपच कमी होतं आहे , त्यामुळे त्या रुग्णांना रक्तातील प्लेटलेट्स द्याव्या लागतात. प्लेटलेट्स २ प्रकारच्या असतात , रेनडम डोनर प्लेटलेट्स ( RDP) , सिंगल डोनर प्लेटलेट्स ( SDP) यांत १) आरडीपी हे आपण जे रक्तदान करतो त्या रक्तातून मशीनद्वारे तयार करावे लागतात व ते तयार केल्या नंतर त्याचा वापर केवळ ५ दिवसात करावा लागतो , नंतर ते निरुपयोगी ठरतात , त्यामुळे ठराविकच रक्ताचा वापर करून RDP तयार करतात , म्हणून RDP पाहिजे तेव्हा जास्त प्रमाणात उपलब्ध होत नाही. २) एसडीपी हे नियमित रक्तदान शिबिरात रक्तदानातून तयार करता येत नाही.
SDP साठी डोनरला रक्तपेढीत बोलावून त्याचे सर्व टेस्ट केले जातात व त्याच्या रक्तातील प्लेटलेट्स ची संख्या सुमारे २ लाख किंवा त्यापेक्षा अधिक असणे जरूर असते.सर्व टेस्ट ओके झाल्यावर त्या रक्तदात्याच्या रक्तातून मशीन द्वारे SDP बनवल्या जातात , परंतु ह्या SDP च्या १ बॅगची किंमत कमीत कमी रू. ११ हजार व त्या पेक्षाही अधिक असते , कारण SDP च्या किटची किंमत सुमारे रु ७ हजार इतकी आहे. रुग्णांच्या प्लेटलेट्स १० हजारच्या आत झाल्यास डॉक्टर SDP आणायला सांगतात , हे आर्थिक दृष्टीने परवडत नाही व उपलब्ध सुद्धा होत नाही, तरी सुद्धा आपण RDP व SDP उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो.

पावसामुळे अनेक लोक आजारी पडतात , त्यामुळे प्लेटलेट्स खूप लागतात.सध्या डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण जास्त असल्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे व रक्तदान शिबिरे सुद्धा कमी प्रमाणात आयोजित होत आहे . एकदा रक्तदान कराल तर ते तीन जणांना उपयोग होतो , रक्ताला जात-पंथ-धर्म- गरीब-श्रीमंत हे भेदभाव नसतात , रक्त दिल्याने वाढते. ज्ञानदान – अन्नदान – व आता सर्वश्रेष्ठ रक्तदान झाले आहे , तुम्ही केलेले रक्तदान दुर्धर आजारी असणाऱ्यांना उपयोगी येते.
त्यातच या थैलेसेमिया मायनर व मेजर या दुर्धर आजाराच्या रुग्णांना रक्ताची गरज खूपच असते .आता नजिकच्या काळात म्हणजे १० दिवसावर येणाऱ्या ” गणेशोत्सव ” हा महाराष्ट्राचा मोठा सण येत आहे.तरी सर्व गणेश मंडळ , सर्व राजकीय पक्ष , सर्व महाविद्यालय , सर्व कारखाने व सर्व सामाजिक संस्थेने रक्तदान शिबिराचे आयोजन करून थैलेसिमीया तसेच मलेरिया व डेंग्यू सारख्या आजारावर मात करण्यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून रुग्णांना मदत करावी , असे भावनिक आवाहन रुग्णांना जीवन जगण्यासाठी ” कवच कुंडले ” देणारे राजाभाऊ कोठारी सर ( रायगड भूषण – रक्तदान शिबीर संयोजक – सार्वजनिक रक्तदाते , कर्जत – रायगड ) यांनी केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page