लोणावळा प्रतिनिधी : शहरात एका अल्पवयीन मुलीला चॉकलेटच्या बहाण्याने अपहरण करण्याचा धक्कादायक प्रयत्न सोमवारी (दि. 24 मार्च) सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. जयचंद चौकातील जुन्या बाजारपेठेत घडलेल्या या घटनेत आई आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीचा डाव फसला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीचा हात पकडून तिला जबरदस्तीने दुकानात नेले. तिथे चॉकलेट आणि फ्रुटी देऊन तिला आपल्या सोबत येण्यास भाग पाडण्याचा त्याचा प्रयत्न होता.
मात्र, हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा सुरू केला. उपस्थित नागरिकांनी तातडीने पुढे येत आरोपीच्या तावडीतून मुलीची सुटका केली. यानंतर जमावाने आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 137(2), 62 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 12 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आरोपीचे नाव श्रीपती महादेव गायकवाड (रा. साने चौक, स्वराज्य हौसिंग सोसायटी, चिखली, पुणे) असे असून, त्याच्याविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश भिसे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या घटनेनंतर लोणावळा परिसरात पालकांमध्ये मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. अशा प्रसंगांमुळे पालकांना आपल्या मुलांप्रती सतत सजग राहण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास तातडीने हाती घेतला असून, आरोपीच्या पार्श्वभूमीची चौकशी सुरू असल्याचे समजते.