Thursday, November 21, 2024
Homeपुणेकामशेतअवैध दारू धंदे विरोधात आमदार शेळके, रमेश साळवे यांचा कामशेत पोलीस ठाण्यावर...

अवैध दारू धंदे विरोधात आमदार शेळके, रमेश साळवे यांचा कामशेत पोलीस ठाण्यावर मोर्चा…

कामशेत(प्रतिनिधी): शहर परिसरातील अवैध दारु धंद्यांच्या विरोधात आमदार सुनील शेळके यांचा कामशेत पोलीस ठाण्यावर बेधडक मोर्चा काढण्यात आला.

अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करावी , अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या कामशेत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची तातडीने बदली करण्यात यावी , या मागणीसाठी मावळचे आमदार सुनिल शेळके व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली आज रविवार दि.21 रोजी सकाळी कामशेत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता . जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ . अभिनव देशमुख यांनी संबंधित पोलीस निरीक्षकावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले .

कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारुधंद्यांवरून गोळा केलेल्या गावठी दारूसह राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कामशेत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता . तालुक्यातील गुन्हेगारी वाढण्यासाठी कारणीभूत असलेल्या अवैध दारुच्या धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस निरीक्षकाची बदली होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका आमदार शेळके यांनी घेतली.

तर पुणे – मुंबई महामार्गावर रास्ता – रोको आंदोलन करण्याचा इशाराही शेळके यांनी यावेळी दिला. तसेच आम्हाला रक्षक पाहिजे भक्षक नको असे प्रतिपादन आमदार शेळके यांनी केले.सर्वसामान्य नागरिक तसेच कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी अवैध दारुधंद्यांबाबत तक्रारी करून देखील कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारुधंदे राजरोसपणे सुरू आहेत . याचाच अर्थ या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक त्यांना पाठीशी घालत आहेत . ही खूप गंभीर बाब असून अशा पोलीस अधिकाऱ्याची तातडीने येथून बदली करावी व चांगल्या पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करावी , अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

मावळ तालुक्यात कोथुर्णे येथे झालेल्या दुर्दैवी घटनेतील आरोपी व्यसनाधीन होता . त्यामुळे असे अवैध दारुधंदे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी आपण अधिवेशनात केली होती . विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कामशेत परिसरात मिळालेल्या गावठी दारूचे कॅन नेऊन अवैध दारू धंद्याच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचा इशाराही शेळके यांनी दिला.

संबंधित पोलीस निरीक्षकावर कारवाईचे आश्वासन डॉ . देशमुख यांनी दिल्यानंतर आमदार शेळके यांनी आंदोलन स्थगित करीत असल्याची घोषणा केली . अवैध दारुधंद्यांच्या विरोधात आपली लढाई चालूच राहील . त्यासाठी यापेक्षा तीव्र जनआंदोलन केले जाईल , असा इशाराही त्यांनी यावेळी दिला . यावेळी रमेश साळवे , विठ्ठलराव शिंदे , ऍड. रूपाली दाभाडे , महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा दिपाली गराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पदाधिकारी , कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page