Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडआमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते ममदापुर येथे नव्या " उर्दू शाळेचे...

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते ममदापुर येथे नव्या ” उर्दू शाळेचे ” भव्य उद्घाटन !

मंदिर – मशिदीप्रमाणे शाळेचंही पावित्र्य जपलं तर इथे उद्याचं भविष्य घडेल –
आमदार महेंद्र शेठ थोरवे.

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत – खालापूर मतदार संघात ” शाश्वत आणि सर्वसमावेशक ” विकासाचा खरा अर्थ प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देशाचे उद्याचे भविष्य शाळेमधून घडविणारे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून ६० लाखाचा निधी मंजूर करून कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील ममदापुर येथे नव्याने उभारलेल्या उर्दू शाळेचे भव्य उद्घाटन आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक ०१ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. अंदाजे शंभर वर्षांची परंपरा लाभलेली ही शाळा मागील अनेक वर्षांपासून मोडकळीस आलेल्या अवस्थेत होती. विद्यार्थ्यांची संख्या असूनही मुलभूत सुविधा नसल्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांचा या शाळेकडे पाठ फिरवली होती . या उद्घाटन समारंभाला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य ” मौलाना सज्जाद नोमानी ” यांची विशेष उपस्थिती लाभली.


ममदापूर येथील उर्दू शाळेची ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली आणि तातडीने ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. आज त्याच निधीतून ममदापुरमध्ये एक सुसज्ज, स्वच्छ आणि सुरक्षित अशी नवी उर्दू शाळा उभी राहिलेली आहे. उद्घाटनप्रसंगी आमदार थोरवे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि काही क्षण मुलांच्या गोड गप्पांमध्ये रमून गेले. विद्यार्थ्यांनीही आपल्या लाडक्या आमदारांचे आभार मानत त्यांचे प्रेमाने स्वागत केले.


यावेळी बोलताना आमदार महेंद्र शेठ थोरवे म्हणाले, “ जसं आपण मंदिर आणि मशिदीचं पावित्र्य जपतो “, तसंच शाळेचंही पावित्र्य प्रत्येकाने राखलं पाहिजे , ही फक्त शाळा नसून इथूनच देशाचे उद्याचे जबाबदार नागरिक व भविष्य घडेल .यावेळी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना सज्जाद नोमानी यांनी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या कर्जत – खालापूर मतदार संघात सर्वसमावेशक विकास कार्यातील ” कार्यपद्धतीचं आणि दूरदृष्टीचं ” कौतुक करत त्यांनी “ शिक्षण हे एक सामाजिक बंध तयार करतं,” असा महत्त्वपूर्ण संदेश दिला. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक, ग्रामस्थ व पालक वर्ग उपस्थित होता.

- Advertisment -

You cannot copy content of this page