Sunday, August 3, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडआरपीआय जिल्हा संपर्क प्रमुख व पत्रकार धर्मानंद गायकवाड यांचे कर्जत येथे अपघातात...

आरपीआय जिल्हा संपर्क प्रमुख व पत्रकार धर्मानंद गायकवाड यांचे कर्जत येथे अपघातात दुःखद निधन !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत – किरवली रेल्वे ब्रीज वरून इनोव्हा गाडीचा ताबा सुटल्याने ती खाली पडून रेल्वे रुळावर मालगाडीला धडक बसून तिघेजण मृत्युमुखी पडले असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत . दि. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे साडे तीनच्या दरम्यान हा गंभीर अपघात झाला असून यात ” रायगड टाइम्स ” चे पत्रकार धर्मानंद यशवंत गायकवाड वय – ४१ हे आपले दोन मावस भाऊ नितीन मारुती जाधव (वय ४८), मंगेश मारिया जाधव (वय ४६) ह्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पत्रकार जयवंत हाबळे (वय ४४), संतोष जाधव (वय ४०) ह्यांना पुढील उपचारासाठी पनवेल येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रख्यात पत्रकार , तथा आरपीआय चे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड हे कर्जत तालुक्यातील आसल या गावी रहाणारे असून सध्या ते नेरळ – राजेंद्र गुरूनगर येथे वास्तव्यास होते . अत्यंत शांत स्वभावाचे मात्र प्रसंगी कडक वागणारे धर्मानंद गायकवाड हे सन २००० सालापासून पत्रकारितेत उतरले होते . सुरुवातीस त्यांनी साप्ताहिक ” पाथेय भारत ” यात काम केले नंतर ते रत्नागिरी टाइम्स च्या रायगड टाइम्स या आवृत्ती पेपरमध्ये त्यांच्या उल्लेखनीय बातमीने ते खूपच प्रसिद्ध झाले . ते महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती सदस्य पत्रकार असल्याने शासकीय दरबारी त्यांचा दबदबा होता.
मध्यंतरी त्यांनी ” साप्ताहिक धर्मानंद ” नावाने पेपर सुरू केला होता . सहा फूट उंच व रुबाबदार दिसणारे धर्मानंद यांना सोने अंगावर घालण्याचा खूप शोक होता . त्यांच्या धडाडीच्या स्वभावामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) गटाचे ते रायगड जिल्हा संपर्क प्रमुख झाले . नेरळ ग्रामपंचायतीचे ते सदस्य होते . कमी वयातच त्यांनी व्यवसायात देखील पदार्पण केले असल्याने ते कर्जत तालुक्यात यशस्वी व्यापारी म्हणून देखील प्रसिद्ध होते .त्यांचे नेरळ येथे हॉटेल , फॅमिली रेस्टॉरंट बार – लॉज असून तांबस येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना फार्म हाऊसवर रहाण्याची सुविधा होती तर ते जागा जमिनी खरेदी – विक्रीत देखील खूप वर्षे होते तर इमारत बांधकाम क्षेत्रात देखील ते काम करत होते.
रायगड जिल्ह्यातील तसेच मुंबई येथील अनेक राजकीय पक्षातील मान्यवरांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते . गरीब कुटुंबातून वर आलेले धर्मानंद हे गरीब – गरजू नागरिकांना व सर्व धार्मिक कार्यक्रम , महापुरुषांची जयंती व कला क्षेत्रातील कलावंतांना त्यांची नेहमीच मदत असे.दिनांक ६ नोव्हेंबर रोजी आपल्या कामासाठी ते मुंबई येथे गेले असता दि. ७ नोव्हेंबर रोजी पहाटे उशिरा ते कर्जत मार्गे आपल्या चारचाकी ईनोव्हा गाडीने घरी निघाले होते . मात्र त्या अगोदरच काळाने त्यांच्यावर झडप टाकली . कर्जत – किरवली येथील रेल्वे ब्रीजवर वेगात असलेल्या इनोव्हा कार वरील ताबा सुटल्याने पुलावरील संरक्षक लोखंडाचे बॅरिकेड तोडून गाडी रेल्वे रुळावर पडली. आणि त्याच क्षणी रुळावरून जाणाऱ्या मालगाडीला देखील धडकली. त्यामुळे सदर अपघातात जेष्ठ पत्रकार धर्मानंद गायकवाड , नितीन मारुती जाधव , मंगेश मारिया जाधव ह्यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्रकार जयवंत हाबळे , संतोष जाधव ह्यांना पुढील उपचारासाठी पनवेल येथे पुरोहित व एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यांच्या अंत्ययात्रेला आरपीआय चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले तसेच कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते . त्याचप्रमाणे आरपीआय , शिवसेना शिंदे गट , शिवसेना उध्दव ठाकरे गट , भाजप , मनसे , काँग्रेस , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , शेकाप , वंचित बहुजन आघाडी , त्याचप्रमाणे सामाजिक – धार्मिक – शैक्षणिक – सांस्कृतिक व पत्रकार क्षेत्रातील अनेक मान्यवर , पदाधिकारी व कार्यकर्ते बहुजन समाज तसेच कर्जत तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी कर्जत व नेरळ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता . समस्यांना वाचा फोडून निर्भीड न्याय देणारे , दानशूर व्यक्तिमत्त्व तसेच राजकीय व शासकीय क्षेत्रात दबदबा असलेले धर्मानंद गायकवाड काळाच्या पडद्याआड गेल्याने पत्रकारिते बरोबरच सर्व क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page