अपक्ष उमेदवार ” सुधाकर भाऊ घारे ” यांचा उमेदवारी अर्ज ” धूमधडाक्यात ” सादर !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) सर्वांत आधी मी माझा उमेदवारी अर्ज भरणार , हा शब्द पाळत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणारे राजिपचे मा. उपाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कर्जत शहरात ढोल ताशांच्या गजरात रॅली काढून शक्तिप्रदर्शन करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज प्रशासकीय भवन येथे प्रांत कार्यालयात दाखल केला .
अपक्ष उमेदवार सुधाकर भाऊ घारे शुक्रवार दिनांक २५ ऑक्टोंबर २०२४ रोजी उमेदवारी भरणार या दिलेल्या ” एक आवाजात ” आज हजारो कार्यकर्ते , महिला वर्ग त्यांच्या पक्ष कार्यालयात दाखल झाले होते . छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेल्या भगव्या व जय भीम तसेच चक्र असलेल्या निळ्या पट्ट्या परिधान करून व डोक्यावर निळ्या – भगव्या व सफेद त्यावर ” मी सुधाकर घारे ” असे अक्षरे लिहिलेली असल्याच्या टोप्या घालून हजारो कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात कर्जत शहरात सुधाकर भाऊ घारे यांनी रॅली काढून नागरिकांना नमस्कार , हात उंचावून ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज ” यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सुधाकर भाऊ घारे यांनी या मतदार संघात अन्याय अत्याचार , गुंड शाही , दादागिरी , हाणामारी , भ्रष्टाचार , रोजगार , चांगले रस्ते , पाणी टंचाईवर मात , महिलांना संरक्षण , महिला सक्षमीकरण , यावर मात करण्यासाठी मी निवडणुकीस सामोरे गेलो असून , त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर कडाडून ताशेरे ओढले . या मतदार संघात कोण म्हणतो , १ हजार करोड , यांचा जिल्हा प्रमुख म्हणतो , २ हजार , तर आमदार म्हणतात २९०० करोड , अशी ” अंकात गफलत ” करून जनतेला फसवत आहेत , यावर प्रकाश टाकला . रस्ते , ब्रीज , प्रशासकीय भवन , कोंढाणा धरण प्रकल्प , हि कामे व निधी २०१८ मध्येच मंजूर झाले असून यांनी कुठली मंजुरी आणली ? असा संतापजनक सवाल त्यांनी उपस्थित केला . तर मागील सभेत दिलेल्या धमकीला उत्तर देताना सुधाकर भाऊ घारे म्हणाले की , अशा पोकळ धमकीला आम्ही घाबरत नाही . ” जशास तसे ” उत्तर द्यायला आम्हाला पण येते , म्हणूनच येणाऱ्या २३ तारखेला जनताच तुमचा ” करेक्ट ” कार्यक्रम करणार , असे आव्हान त्यांनी या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांना दिले . यावेळी सर्वांनी मला साथ देवून विजयी करा , गुलाल आपणच उडवू , असे आवाहन अपक्ष उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांनी उपस्थित कार्यकर्ते व कर्जत मतदार संघातील मतदारांना केले . पुन्हा या पोलीस मैदानावर आपण विजयी सभा घेवू , असे आश्वासन सर्वाँना दिले . हजारो कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने सर्वांचे आभार सुधाकर भाऊ घारे यांनी व्यक्त केले.
यावेळी कर्जत खालापूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणारे अनेक मान्यवर , महिला वर्ग , मोठ्या संख्येने कार्यकर्ते पोलीस ग्राऊंडवर उपस्थित होते . खूप मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून सुधाकर भाऊ घारे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला , तर जोषपूर्ण भाषण केल्याने टाळ्यांचा कडकडाट व घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.