वडगाव मावळ :” ज्युनिअर एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2022″ या स्पर्धेत हर्षदा गरूडने सुवर्णपदक मिळवले आहे .
एशियन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून भारताची जागतिक सुवर्णपदक विजेती वेटलिफ्टर वडगांव मावळची हर्षदा गरुड हिने पुन्हा एकदा आपले वेटलिफटिंग मधील निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे.
ताशकंद येथे 17 ते 25 जुलै पर्यंत सुरू असलेल्या ज्युनिअर एशियन वेटलिफटिंग चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत सोमवारी 45 किलो वजनी गटात हर्षदाने स्नॅच प्रकारात 69 किलो व क्लीन आणि जर्क प्रकारात 88 किलो असे एकूण 157 किलोग्रॅम वजन उचलून सुवर्णपदक मिळविले आहे .
वडगाव मावळ येथील दुबेज गुरुकुल ची खेळाडू हर्षदाने मे महिन्यात ग्रिस येथे झालेल्या जागतीक वेटलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून , हे पदक मिळविणारी भारतातील पहिली महिला होण्याचा मान मिळविला होता . सोमवारी ताशकंद येथे सुरू असलेल्या एशियन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून तिने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवण्यात यश मिळविले . सध्या ती पतियाळा येथील इंडिया कॅम्प मधे सराव करत आहे.
भविष्यकाळात हर्षदा भारतीय वेटलिफ्टींग मधे इतिहास निर्माण करेल असा विश्वास तिचे गुरू बिहरीलाल दुबे यांनी व्यक्त केली . हर्षदा शिकत असलेल्या इंद्रायणी महाविद्यालयाचे अध्यक्ष रामदास काकडे व कार्यवाहक चंद्रकात शेटे यांनी तिचे अभिनंदन केले आहे . पुणे जिल्हा वेटलिफ्टींग संघटनेचे चेअरमन गणेश काकडे यांनी देखील हर्षदाच्या कामगिरीचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वडगांव मावळला क्रिडाक्षेत्राचा वारसा आहे तसेच वेटलिफ्टींग ची पंढरी म्हणूनही वडगांवची ओळख आहे . हर्षदाच्या कामगिरीतील सातत्याने ही ओळख जगभरात पोचली या शब्दात वडगांव मावळ नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी हर्षदाचे कौतुक केले.मावळ तालुक्यातील क्रीडाक्षेत्र व नागरिकांकडून तिचे कौतुक होत आहे .