कर्जत आगारातील २०० कामगार संपात सहभागी , प्रवासी – कामगार वर्गाला याचा फटका..
भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
गाव तिथे एस.टी. हात दाखवाल , तिथे थांबणार एस.टी. , या तत्व प्रणालीवर चाललेल्या राज्य परिवहन मंडळाची एस.टी. सेवा फायद्यात चाललेली असताना , ग्रामीण भागातील व लांब पल्ल्याचा सुखकर , प्रवासाची हमी असलेल्या या दळण वळणाच्या प्रमुख आधाराकडे वर्षेंनुवर्षं कामगारांवर अन्याय झाल्याचे दिसून येत आहे . वेळोवेळी कामगार विविध मागण्या करूनही , सरकार ” वाटाण्याच्या अक्षता ” दाखवून संधीसाधूपणा करत असल्याने मात्र ऐन दिवाळीच्या मोक्यावरच एस.टी. कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारल्याने , प्रवासी – कामगार – कर्मचारी यांना या बंदच्या परिणामाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सर्वत्र आहे.
कर्जत आगारात देखील येथील २०० कामगारांनी पेण – रामवाडी येथे बसलेल्या बेमुदत काम बंद आमरण उपोषणास पाठींबा दर्शवत आज सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत , निषेध व्यक्त केला. राज्य परिवहन कामगारांच्या मान्य केलेल्या अनेक आर्थिक प्रश्नांची सोडवणूक राज्य परिवहन प्रशासनाकडून होत नसल्याने कामगारांच्या आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत , विशेषता केलेल्या कामाचे वेतन वेळेवर न मिळणे , यामुळे आर्थिक नैराशेपोटी सुमारे 25 कामगारांनी आत्महत्त्या सारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.
अशा घटना यापूर्वी कधीही घडल्या नव्हत्या . राज्य परिवहन प्रशासनाने दि. ३० जून २०१८ मध्ये परिपत्रिकीय सूचना काढून मागण्या मान्य केलेले असतानाही अद्यापी राज्य परिवहन कामगारांना वार्षिक वेतन वाढीचा दर तीन टक्के व घरभाडे भत्ता दर 18 16 24 लागू केलेले नाही हे अन्याय करत आहे . कामगार कायद्याच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होणारा महागाई भत्त्याचा दर राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना लागू करण्याचे मान्य केलेले असतानाही शासन निर्णयानुसार महागाई भत्त्याचा दर जुलै २०१८ ते सप्टेंबर २०१८ च्या कालावधीची तीन महिन्यांची दोन टक्के माहे जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीची नऊ महिन्याची तीन टक्के महागाई भत्त्याची थकबाकी राज्य परिवहन कामगारांना अद्याप मिळाली नाही तसेच महागाई भत्ता डिसेंबर २०१९ पासून १२ टक्केवरून १७ टक्के असा लागू करून देखील सदर वाढीव पाच टक्के महागाई भत्ता राज्य परिवहन कामगार यांना लागू करण्यात यावा व आता राज्य शासनाने दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ पासून महागाई भत्त्याच्या दरामध्ये १७ टक्के वाढ करून २८ टक्के अशी वाढ केली असून सदर वाढीव महागाई भत्ता ऑक्टोबर २०२१ सोबत रोखीने देण्याचे मान्य केले आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना आता महागाई भत्त्याचा दर २८ टक्के लागू केलेला असतानाही राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना मात्र माहे ऑक्टोबर २०१९ पासून ते आत्तापर्यंत १२ टक्के महागाई भत्ता दिला जात आहे , ही बाब राज्य परिवहन कामगार यांना अन्याय करणारी आहे.कोरोनाच्या कालावधीत राज्य परिवहन कामगार यांनी आपला जीव धोक्यात घालून राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक दिवस-रात्र सुरू ठेवलेली असतानाही कोरोनामुळे महामंडळाच्या ३०० पेक्षा जास्त कर्मचारी मृत झालेला असतानाही कामगारांना नियमित तारखेला वेतन मिळत नाही . वाढीव महागाई भत्ता दिला जात नाही आणि वार्षिक वेतन वाढीचा दर व घरभाडे भत्त्याचा शासन लागू करण्याचे दिनांक ३० जून २०१८ परिपत्रक प्रमाणे मान्य करूनही अद्याप त्याची अंमलबजावणी केली जात नाही . त्याच प्रमाणे २०२१ लॉकडाउन काळातील कोविड भत्ता चालकातील कामगारांना मुंबई विभागात अद्याप दिलेला नाही . सदर बाबतीत तरतूद मंजूर आहे.
परंतु अद्याप वाटप करण्यात आली नाही , त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून सध्याच्या वाढत्या महागाईच्या कालावधीत कामगारांना आपला उदरनिर्वाह करणे फार कठीण जात आहे त्यामुळे महामंडळातील सुमारे पंचवीस कर्मचारी आर्थिक विवंचनेत आत्महत्या केलेले आहे तरीही प्रशासना कडून कामगारांना नियमानुसार देय होणाऱ्या या आर्थिक बाबींची पूर्तता होत नसल्यामुळे संपूर्ण कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासनाच्या विरोधात नाराजी निर्माण झालेली आहे.त्याप्रमाणे ऑक्टोबर २०२१ दिवाळीपूर्वी मिळणे आवश्यक असून सन उचल रक्कम शासकीय नियमाप्रमाणे १२५००/- रू . तसेच दिवाळी भेट रक्कम रुपये १५००० /- दिवाळीपूर्वी देण्यात यावी अशी मागणी कामगारांनी केली असून त्याप्रमाणे शासनाच्या विरोधात लढा देत आहे.
सदर मागण्या मा.मुख्यमंत्री व मा. परिवहन मंत्री , महाराष्ट्र राज्य यांच्याकडे करण्यात आलेल्या असून जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत , तोपर्यंत हा लढा बेमुदत उपोषणाच्या मार्गाने चालूच राहील ,असे कर्जत डेपो कृती समितीचे रमेश जाधव – अध्यक्ष ( कामगार संघटना ) , नागेश भरकले – सचिव (कामगार संघटना ), कमळाकर किरडे – अध्यक्ष ( इंटक संघटना ) , सुरेश पाटील – सचिव ( इंटक संघटना ) , बबन ऐनकर – अध्यक्ष ( कामगार सेना ) , विशाल गेडाम – सचिव ( कामगार सेना ) या कमिटीने राज्य परिवहन रायगड विभाग पेण विलास खोपडे , सिताराम कांबळे , गणेश शेलार , संभाजी मोरे , एम के पवार , श्रीपती कांबळे , डी डी ओव्होळ , संदीप मोने , रामवाडी येथे बसलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनाला सर्व संघटनांनी काम बंद आंदोलन करून जाहीर पाठिंबा दिला आहे.