Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये " युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या " सभेसाठी जय्यत तयारी !

कर्जतमध्ये ” युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या ” सभेसाठी जय्यत तयारी !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) सन २०२४ ची विधानसभेची निवडणूक तीन महिन्यांवर येवून ठेपली असून या निवडणूक पूर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा युवासेनाप्रमुख – आमदार आदित्य साहेब ठाकरे यांची जाहीर सभा मंगळवार दिनांक १६ जुलै रोजी कर्जत येथे शेळके हॉलमध्ये सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली असल्याने या सभेला ” अनन्य साधारण ” महत्व आहे . या सभेत येथील उमेदवारी ठरणार असल्याने त्या अनुषंगाने सभेची जय्यत तयारी उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली कर्जत – खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसेना – युवासेना – महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक करण्यास सरसावले असून पुन्हा एकदा १२ जुलै २०२४ रोजी या सभेच्या नियोजना संदर्भात आढावा बैठक उत्तर रायगड युवासेना जिल्हाअधिकारी पराग मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली ” शिवालय ” मध्यवर्ती कार्यालयात पार पडली.

१६ जुलै रोजी युवासेना नेते आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे येणार असल्याने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा आणि कर्जत विधानसभेत पुन्हा एकदा आपला ” भगवा ” फडकवा , हि आपल्या प्रत्येकाची आता जबाबदारी वाढली आहे , असे जोषपूर्ण मार्गदर्शन उत्तर रायगड युवासेना जिल्हाअधिकारी पराग मोहिते यांनी केले . यावेळी युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहितेयांच्या समवेत जिल्हा समन्वयक प्रशांत खांडेकर , जिल्हा चिटणीस निखिल पाटील , उपजिल्हा अधिकारी महेश पाटील , कर्जत विधानसभा अधिकारी ॲड. संपत हडप , तालुका अधिकारी प्रथमेश मोरे , तेजस पाटील , तालुका चिटणीस कल्पेश खडे , निखिल मालुसरे , खालापूर तालुका युवतीसेना संपर्कअधिकारी रिया मालुसरे , खालापूर तालुका युवतीसेना अधिकारी भारती लोते ,खोपोली शहर अधिकारी अदिती गुरव , कॉलेज कक्षाचे प्रमुख सुजल गायकवाड , धर्मेश परमार आदी प्रमुखासह मोठ्या संख्येने सर्व उपतालुका अधिकारी, विभाग अधिकारी, उपविभाग अधिकारी आणि इतर युवासेना व कॉलेज कक्षाचे पदाधिकारी आणि युवा सैनिक उपस्थित होते.

युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे या सभेत कुणाचा समाचार घेतात ? कर्जत खालापूर मतदार संघाकडे त्यांचे विशेष लक्ष असल्याने ते काय मार्गदर्शन करणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे . येथील शिवसेनेची ताकद आताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसैनिकांनी दाखवून दिली असल्याने पुन्हा त्याच ताकदीची संख्या दाखविण्यासाठी व ही सभा ऐतिहासिक होण्यासाठी कर्जत विधानसभा मतदारसंघातील सर्व युवासैनिकांनी , कॉलेज कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सभेच्या तयारी कडे लक्ष देऊन सभा यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेऊन कामाला लागावे , असे निर्देश देखील देण्यात आले आहेत . याप्रसंगी ” शिवालय ” कार्यालयात उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या हस्ते उमरोली जिल्हापरिषद चिटणीस या पदावर अजय कराळे याची पत्र देऊन नेमणूक करण्यात आली.
- Advertisment -

You cannot copy content of this page