(भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे)
लाचलुचपत विभाग युनिट ठाणे येथील पोलीस निरीक्षक सुषमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत वन खात्याचा वनरक्षक अंगद विठ्ठल नागरगोजे यास रुपये ४ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे.हा सापळा संध्याकाळी ५ च्या दरम्यान टाकल्याचे समजते.
कर्जत तालुक्यातील भिसेगाव परिसरात वन खात्याचे कार्यालय आहे . येथे वनरक्षक म्हणून काम करणारे अंगद नागरगोजे वय – ३३ वर्षे, हुद्दा – वनरक्षक , (वर्ग -३) रा. संजयनगर, पूजन प्यालेसिया, सी विंग नं . 101,दहिवली, तालुका कर्जत, जि. रायगड , मुळ रा. सोनवळा , पोस्ट मंगरूळ ता.जळकोट , जि.लातूर यांनी तक्रारदार माजी नगरसेवक बबाळाजी विचारे यांची पत्नी माजी नगरसेविका यमुताई विचारे यांच्या नावे असलेली जागा भिसेगाव ता. कर्जत जि. रायगड येथील सिटी सर्वे नं. ४४३ येणे मिळकत आहे.
तक्रारदार यांना सदरची मिळकत विकसीत करण्याची होती , परंतु त्या मिळकतीवर काही झाडें आहेत म्हणून बाळाजी विचारे यांना सदर जागेवरची झाडे तोडायची असल्याने त्यांनी कर्जत नगर परिषदेची परवानगी घेतली व वनविभाग कर्जत येथे परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला होता, त्या अनुषंगाने वनरक्षक अंगद नागरगोजे हे तक्रारदार यांना भेटून परवानगी न घेता तुम्ही झाडें जर तोडली, तर तुमच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
सदरची कारवाई न करण्यासाठी व परवानगी चे काम करून देण्यासाठी १५ , ०००/- रुपयांची मागणी केली . मात्र तडजोडी अंती ती रक्कम ४ हजार ठरविण्यात आली . वनरक्षक अंगद नागरगोजे यांच्या सततच्या फोन व कारवाई करण्याच्या धमकीमुळे मानसिक तणाव वाढल्याने अखेर तक्रारदार बाळाजी विचारे यांनी लाचलुचपत खाते – ठाणे येथे तक्रार केली असता दि.२४ जून २०२१ रोजी संध्याकाळी ५ च्या दरम्यान अंगद नागरगोजे यांच्यावर पोलीस निरीक्षक सुषमा पाटील व त्यांच्या टिम ने यशस्वी सापळा रचला व वनरक्षक अंगद नागरगोजे यांना ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
सदरचा सापळा पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली,सुषमा पाटील – पोलीस निरीक्षक , एसीबी ठाणे व पथक पोहवा – महाले, पोहवा – शेख , पोहवा – गिते, पोना – खाबडे, पोशि – पारधी आदी यांनी कामगिरी यशस्वी केली , व आरोपी अंगद नागरगोजे यांना अटक करण्यात आली .