Thursday, November 21, 2024
Homeक्राईमकर्जत तालुक्यातील नालधे येथील " खुनाचे मारेकरी " जेरबंद !

कर्जत तालुक्यातील नालधे येथील ” खुनाचे मारेकरी ” जेरबंद !

पोलीसांची ४८ तासांत दमदार कामगिरी..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील नालधे गावाच्या हद्दीत २९ फेब्रुवारी २०२४ रोजी एका अज्ञात तरुणाचा निर्घृण खून करून त्याची बॉडी येथे आणून टाकली असल्याने कर्जत तालुका या घटनेने हादरला होता . यामुळे त्याचा शोध मोहीम करण्याची कर्जत पोलीसांसमोर आव्हान उभे राहिले होते , मात्र कुठलेच धागेदोरे समोर नसताना अवघ्या ४८ तासातच कर्तव्यदक्ष पोलिसांनी या खुनाचा उलगडा करत मारेकरी पर्यंत पोहचून त्यांच्या मुसक्या आवळून जेरबंद केले असल्याने रायगड पोलिसांसह कर्जत पोलीस ठाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रायगड पोलीस अंतर्गत येणाऱ्या कर्जत पोलीस ठाणे, ता. कर्जत, जि. रायगड गुन्हा रजि . क्र.57 / 2024 भा द वि कलम 302 म्हणून नोंद झालेल्या एक पुरूष जातीचे प्रेत वय अंदाजे २५ ते २७ वर्षे त्याचे डावे हाताचे पोटरीवर इंग्रजीमध्ये SURAJ असे नाव गोंदलेले तसेच छातीवर I Love Mom, I Love Dad असे नाव गोंदलेले , अंगात मळकट काळया रंगाचा हाफ बाहयांचा टि-शर्ट , त्याचे उजव्या बाजुला पांढ-या रंगाचे इंग्रजीमध्ये Z असे अक्षर असलेला व फिकट मळकट निळया रंगाची जिन्स पॅन्ट असलेला वरील वर्णनाचा इसम हा दि.२९ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ०७.०० वाजण्याचे पुर्वी मौजे नालधे गावचे हद्दीत ” अबासा फार्महाउसचे ” जवळ कर्जत ते मुरबाड जाणा-या रोडचे डावे बाजुला झाडी झुडपामध्ये दोन्ही हात पाठीमागे व दोन्ही पाय बांधून गळा कापून निर्घण खून केल्याच्या अवस्थेत रोडच्या बाजूला पडलेला होता.

सदर घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी धुळा टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, नेरळ पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे , स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे व पथकाने सदरचा इसम हा आसाम, मिजोरम, सिक्कीम, नेपाळ येथील रहिवाशी असलेबाबत दिसून येत होते , तसेच मयताचे अज्ञात आरोपींनी हात व पाय बांधण्यासाठी वापरलेले कपड्यावर काही खुणा होत्या.
त्याआधारे तपास करीत असताना सदर मयत इसम हा नेपाळ येथून कामधंदानिमित्त पनवेल येथे आल्याची व तो वेगवेगळ्या हॉटेल मध्ये कॅटरर्सचे काम रोजंदारीने करीत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली , परंतु त्याचे नाव, राहण्याचे ठिकाण, माहित नसताना शोध मोहिमेत अडथळा येत असताना देखील सर्व पथकाने आपले कौशल्य पणाला लावले व सदर तपासा दरम्यान मयत इसमाला ओळखणारा व त्यास वेगवेगळ्या हॉटेल मध्ये कॅटरर्सचे कामावर मजुरीने लावणारा लेबर कॉन्ट्रॅक्टर ” दिलीप धनसानी ” यास पनवेल येथून ताब्यात घेवून चौकशी केली, असता पोलिसी खाक्या दाखवताच त्यानेच व त्याचा सहकारी आरोपी विजय रोळी वाघरी वय वर्षे ३८ रा. नवनाथ मंदिर नवनगर झोपडपट्टी स्टेशन रोड पनवेल यांनी मिळून त्यांचे पूर्व वैमनस्यातून मयताला दारू पाजून रिक्षाने नेरळच्या जंगलात प्रथम त्याचे हात पाठीमागे व दोन्ही पाय बांधून धारदार शस्त्राने गळा कापून निर्घण खून करून रिक्षाने त्याचा मृतदेह नालधे गावाच्या हद्दीत निर्जन स्थळी जंगलात फेकून दिल्याचे सांगितले.

त्याप्रमाणे दिलीप रसिक धनसानी वय ३५ वर्षे रा. लेबर कॅम्प, संजय गांधीनगर , कटारिया मार्ग – माटुंगा मुंबई व विजय रोळी वाघरी वय ३८ वर्षे रा. नवनाथ मंदिर नवनगर झोपडपट्टी स्टेशन रोड पनवेल , यांना त्याब्यात घेऊन त्यांनी वापरलेली रिक्षा ताब्यात घेण्यात आली आहे . सदर खुनाच्या गुन्ह्यातील मारेकरी यांचा कुठलाच मागमूस नसताना देखील अवघ्या ४८ तासांत त्यांना पकडल्याने सदर रायगड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे , सपोनि संदीप पोमण व उपविभागीय पोलीस अधिकारी धुळा टेळे , कर्जत पोलीस ठाणेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड , पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे , नेरळ पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे व पथकाने अहोरात्र मेहनत करून दमदार कामगिरी केल्याबद्दल या सर्वांचे कौतुक होत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page