” सुनील सोनावणे व राहुल गायकवाड ” यांचे आमरण उपोषणाला सुरुवात…
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेली अनेक वर्षे कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली प्रभागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे वेळी – अवेळी पुरेसे प्रेशरने पाणी येत नसल्याने येथील नागरिकांना पाण्या अभावी खूप संकटाला सामोरे जावे लागत आहे . यामुळे महिलांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याने येथील महिलांत पालिकेच्या ” ढोबळ कारभारा ” विषयी संताप व्यक्त होत असताना आता या विरोधात सामाजिक कार्यकर्ते सुनील सोनावणे व राहुल गायकवाड हे दंड थोपटून उभे राहिले असून आज गुरुवार दिनांक ०६ मार्च २०२५ पासून मराठी शाळा – दहिवली येथे त्यांनी ” बेमुदत आमरण उपोषणाचा ” पावित्रा घेऊन आज उपोषणाला बसले आहेत . जो पर्यंत पालिका प्रशासन आमच्या पाण्याबद्दल ठोस भूमिका घेत नाहीत , तोपर्यंत ” पाण्याचा एक हि थेंब न घेता हे आमरण उपोषण सुरू राहील ” , असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुनील सोनावणे यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.
गेली अनेक वर्ष दहिवली प्रभागात डॉ. बाबासाहेब आबेडकर नगर मधील रहिवाशांना पिण्याचे पाणी मिळत नाही. याबाबत अनेक वेळा ग्रामस्थानी व स्वतः उपोषणकर्ते सुनील सोनावणे यांनी अर्ज देऊन लेखी तक्रार करून सुद्धा पालिका प्रशासनाने ” पिण्याच्या पाण्याचा ” प्रश्न अजून सोडवला नाही. काही नागरिक व महिला भगिनीना पहाटे पाच वाजल्या पासून पिण्याच्या पाण्यासाठी ” वणवण ” करत फिरावे लागत आहे , यामुळे महिला वर्गाला दैनंदिन कामे करण्यास खूप अडचणीना सामोरे जावे लागत आहे . काही ठिकाणी खूप लिकेज असून ते तक्रारी करूनही काढले गेलेले नाहीत , त्यामुळे परिसरात कमी प्रेशरने पाणी येते . फक्त दहीवली डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवासी वर्गालाच जास्त प्रेशरने पाणी सोडल जात नाही , हि मोठी शोकांतिका असून अनेक वेळा प्रशासनाला सांगून सुद्धा पाणी हा महत्वाचा विषय गांभीर्याने न घेता आजपर्यंत नगर पालिका चाल ढकल करत आहे , यावर प्रकाश टाकत सुनील सोनावणे यांनी पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशाः नागरिकांचे प्रचंड ” हाल ” होत असून हा पाणी प्रश्न त्वरित न सुटल्यास पाण्याचा एक थेंब हि न पिता , हे बेमुदत आमरण उपोषण सुरूच राहील , असे संताप जनक मत व्यक्त केले.
यावेळी उपोषणकर्ते सुनील मालू सोनावणे व राहुल रघुनाथ गायकवाड यांनी पुढील मागण्या केल्या आहेत .१) दहिवली डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील नागरिकांना नियमित प्रेशरने पाणी पुरवठा होणे. २) दहिवली येथील नागरिकांसाठी वेगळी नवीन पाणी टाकी तयार करून ठराव घेणे. ३) उघड्यावरती ज्या पिण्याच्या पाण्याची नळ लाईन आहेत त्या अंडरग्राउंड जमिनीखाली टाकण्यात याव्यात . ४) दहिवली मध्ये ज्या ज्या ठिकाणी लिकेज आहेत ते लिकेज काढण्यात यावेत. ५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील नागरिकांना सेप्रेट ६ इंच पाईप लाईन टाकून देणे.
यावर कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे काय भूमिका घेतात , याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे . मात्र तूर्त तरी कर्जत सहित दहिवली परिसरात पाण्याचा प्रश्न ऐन गरमीत पेट घेणार , असेच काहीसे चित्र येथे दिसत आहे . यावेळी महिला वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने या उपोषणस्थळी उपस्थित होते .