Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत बौद्ध नगर येथील आंबेडकरी चळवळीतील " सुभाष गायकवाड " यांचे दुःखद...

कर्जत बौद्ध नगर येथील आंबेडकरी चळवळीतील ” सुभाष गायकवाड ” यांचे दुःखद निधन !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषद हद्दीतील बौद्ध नगर येथील रहिवासी , भारतीय बौद्ध महासभेचे माजी शहराध्यक्ष , संविधान गौरव समितीचे संस्थापक अध्यक्ष , व साप्ताहिक जम्बुद्विप टाईम्स चे संपादक सुभाष रामचंद्र गायकवाड यांचे काल दि. १२ नोव्हेंबर २०२३ रोजी एम जी एम हॉस्पिटल पनवेल येथे अल्पशा आजाराने निधन झाले . गेली सहा महिन्यांपासून ते आजारी होते . त्यांच्या दुःखद निधनाची वार्ता समजताच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर व परिसरात व त्यांच्या कुटुंबावर दुःखाची छटा पसरली.

सुभाष गायकवाड हे अत्यंत शांत स्वभावाचे , निर्व्यसनी व बहुजन समाजातील असलेल्या समस्यांची जाण असलेले कार्यकर्ते होते . रायगड जिल्ह्यातील नावाजलेली पेण को ऑप अर्बन बँकेत ते कामाला होते . काम करत असतानाच ते भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संस्थेत काम करत असताना बौद्धाचार्य म्हणून त्यांनी कर्जत तालुक्यात काम केले . फुले – शाहू – आंबेडकरी विचारधारा पसरविणाऱ्या बहुजन समाज पार्टीत देखील त्यांनी काम केले.
तर संविधान गौरव समितीचे ते संस्थापक अध्यक्ष होते . बहुजन समाजातील अन्याय – अत्याचार तर अनेक समस्या लेखणीच्या माध्यमातून सोडविण्यासाठी त्यांनी साप्ताहिक ” जम्बुद्विप टाईम्स ” चे संपादक म्हणून खूप वर्षे काम केले . पँथर नंतर उदयास आलेल्या आरपीआय पक्षाच्या उभारणीला देखील त्यांची साथ मोलाची लाभली . कर्जत बौद्ध नगर येथील ” राहुल युवक मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते , परिसरात त्यांना ” सर ” म्हणून बोलत.

पेण अर्बन बँक मोडकळीस आल्यापासून त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले . त्यांचा एक मुलगा अपघाती निधन झाला होता तर कुटुंबात देखील अनेक संकटे येवूनही ते कधीच डगमगले नाहीत . चार वर्षापूर्वीच ते रिटायर्ड झाले होते . छत्रपती – फुले – शाहू – आंबेडकरी विचार धारेवर ते शेवटपर्यंत ध्येयाने कार्य करीत राहिले . कर्जत तालुक्यातील आंबेडकरी समाजाच्या येणाऱ्या प्रत्येक समस्या व प्रसंगात ते हिरीरीने भाग घ्यायचे . भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तयार होताना व आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन तयार होण्यासाठी या संघर्षमय काळात त्यांचा खारीचा वाटा होता.
कर्जतमध्ये होणाऱ्या ” भीम जयंती महोत्सवात ” त्यांचा हिरीरीने सहभाग होता . त्यांच्या दुःखद निधनाने आंबेडकरी चळवळीतील धार्मिक – शैक्षणिक – राजकीय – सामाजिक – सांस्कृतिक क्षेत्रात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीच भरून निघणार नाही . त्यांच्या अंत्ययात्रेस कर्जत – खालापूर तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते , त्यांचे नातेवाईक , मित्र परिवार उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page