रेल्वे प्रवासी अनेक सुविधांपासून वंचित , प्रवासी संघटनेच्या कार्यावर प्रश्नचिन्ह…
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) जग चंद्रावर जायला लागलं , तरी कर्जतकर जनता योग्य सोई सुविधांच्या अभावामुळे अजूनही ” शोले पिक्चर मधल्या रामगड ” गावात असल्यागत वाटत आहेत . कर्जत शहराची सुरुवात हि ” कर्जत रेल्वे स्थानकापासून ” होते . मुंबई – पुणे रेल्वे प्रवासाचा मध्य असलेले कर्जत म्हणजे ” आत्मा ” असूनही येथील समस्या काही सुटता सुटत नसल्याने दिवसेंदिवस कर्जत रेल्वे स्थानक समस्यांचं माहेरघर झाले आहे.
कर्जत रेल्वे स्थानक परिसरात आल्यावर उत्तरप्रदेश मधील कुठल्या तरी खूपच ग्रामीण भागातील रेल्वे स्थानक परिसरात असल्यागत वाटतं , म्हणूनच तर गेल्या काही दिवसांपूर्वी येथे पिक्चर ची शूटिंग झाली होती , त्यावेळी कर्जत रेल्वे स्थानकाला ” रामगड रेल्वे स्थानक ” हे नाव दिले होते , मात्र येथील समस्या सोडविण्यास येथील राजकीय पक्ष , कर्जत रेल्वे प्रवासी संघटना , नॅशनल रेल्वे मजदूर संघटना , तसेच इतर रेल्वे कामगार संघटना , रेल्वे प्रशासन ” मूग गिळून ” गप्प असून फक्त बघ्याची भूमिका बजावत असल्याने रेल्वे प्रवाश्यांत या सर्वांवर संताप खदखदत आहे.
कर्जत रेल्वे स्थानकाच्या परिसरात प्रवासी आला कि तेथील खडीयुक्त परिसराचा सामना करावा लागतो , अत्यंत घाणेरडा परिसर वाटत असून या परिसरात पाच वर्षे डांबरीकरण झाले नाही . हा रस्ता थेट घाटबंगला येथून पुढे रेल्वे अलाऊन्समेंट केबिनच्या इमारतीकडे जातो , या घाटबंगला परिसरात रेल्वे कामगार वर्ग रहात आहेत , तर केबिनमध्ये महत्वाचे काम होत असताना त्यांना जाण्यायेण्याचा मार्ग असा खडतर आहे , तर दर पावसाळ्यात येथून मार्ग काढताना खूपच दयनीय अवस्था होते .मात्र याकडे कामगार संघटनेचे दुर्लक्ष होत आहे.
कर्जत रेल्वे स्थानका वर गेल्यावर , एक महिना सांगून पुलाचे सुरू केलेले काम तीन महिने होत आले तरी अद्यापी पूर्ण झाले नाही . येथील शौचालय रात्री १० वाजताच बंद होते , भिसेगाव गेट येथील तिकीट घर संध्याकाळी ४ वाजताच बंद केले जाते , रेल्वे प्रवाश्यांचा अपघात झाल्यास त्या रुग्णास उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी इमर्जन्सी रुग्णवाहिका रेल्वे स्थानक परिसरात नसल्याने रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी स्ट्रेचर वर धावत – पळत होमगार्डना घेऊन जावे लागते.
मुंबई – पुण्याचे मध्य असूनही रेल्वे स्थानक परिसरात कुठल्याही बँकेचे एटीएम नाही , त्यामुळे प्रवासी वर्गाला पैशाची गरज भासल्यास श्री कपालेश्वर मंदिराकडे जावे लागते , त्यामुळे प्रवाशांना हे शक्य नसते , गुंडगे परिसरातील नागरिकांना तिकीट काढण्यास एक नंबर स्थानक परिसरात जावे लागते , त्यामुळे अनेकदा त्यांच्या गाड्या जातात , म्हणून गुंडगे नवीन ब्रिज वर तिकीट घर असणे गरजेचे आहे , तर या परिसरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने येथून अनेकांच्या गाड्या चोरीस जात आहेत.
या सर्व गंभीर समस्येकडे कर्जत रेल्वे प्रवासी संघटना दुर्लक्ष करत असून प्रवासी वर्गांना या सुविधा कधी मिळणार ? असा संतापजनक सवाल या निमित्ताने ” टाहो ” फोडत आहे .
तर कोरोना काळात बंद झालेल्या रेल्वे गाड्या अद्यापी सुरू झाल्या नाहीत तर अनेक गाड्याना पूर्वी कर्जत थांबा होता , त्या गाड्या देखील येथे थांबत नसल्याने राजकीय पक्षावर देखील रेल्वे प्रवासी वर्गाची नाराजगी आहे , या सर्व समस्या आज ही ” जैसे थे ” असल्याने सर्वच संबंधित रेल्वे प्रवासी संघटना , कामगार संघटना , व राजकीय पक्षाचे पदाधिकारी नक्की काम तरी काय करतात ? असा संतापजनक सवाल कर्जतकर करताना दिसत आहेत.