” भूल देणे ” हा काय प्रकार , यासंबंधी जनजागृतीची गरज..
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यात ” भुल देवून ” लुटण्याचा पुन्हा एकदा प्रकार घडला असून कशेळे गावात हा प्रकार घडला असून भर बाजारपेठेत असे प्रकार घडत असल्याने व्यापारी वर्गात घबराट पसरली आहे.
कर्जत तालुक्यातील कशेळे बाजारपेठ आता खूपच वाढीस लागली आहे , अशा कशेळे बाजारपेठेत ” ललित हार्डवेअर ” नावाचे दुकान आहे . नेहमी प्रमाणे ललित यांची आई चंद्रकांता लक्ष्मीचंद्र गोर , वय – ७५ वर्षे यांनी सकाळी ८ वाजता दुकान उघडले . थोड्याच वेळात तेथे दोन इसम आले , त्यातील एकाने चंद्रकांता यांना अकराशे रुपये दिले आणि सदर पैसे हनुमान मंदिरात दान करा असे सांगितले.
त्याच सोबत त्यांच्या गळ्यात असलेली अडीच तोळ्याची सोन्याची चैन पाच मिनिटे काढून ठेवा , असे सांगून ती चैन एका कागदाच्या पुडीत बांधून त्यांच्या हातात दिली आणि सदर पुडी दहा मिनिटांनी उघडण्यास सांगितले. सदर इसम गेल्या नंतर पाच मिनिटांनी चंद्रकांता यांनी पुडी उघडली असता त्यात चैन च्या ऐवजी दगड असल्याचे आढळून आल्याने त्यांनी या बाबत आपल्या मुलाला कळवले , मात्र तोवर हे भूल देवून लुटणारे भामटे पसार झाले होते.
यासंदर्भात ललित गोर यांनी कशेळे पोलीस स्टेशन ला तक्रार दिली असता, पोलीसांनी सगळे सिसी टिव्ही फुटेज तपासले असून सदर चोरांचा तपास चालू केला आहे . आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात आपण असताना ” भूल देणे ” हा काय प्रकार आहे , यासंबंधी पोलीस अधिकारी वर्गाने जनजागृती करणे गरजेचे असल्याचे , या प्रसंगावरून दिसून येत आहे.