Wednesday, February 5, 2025
Homeपुणेकामशेतकामशेतमध्ये अवैध ज्वलनशील द्रव्य साठ्यावर पोलिसांची कारवाई..

कामशेतमध्ये अवैध ज्वलनशील द्रव्य साठ्यावर पोलिसांची कारवाई..

प्रतिनिधी : श्रावणी कामत
कामशेत : येथे मोठ्या प्रमाणात पेट्रोलसदृश आणि रॉकेलसदृश ज्वलनशील द्रव्याचा अवैध साठा आढळून आला असून, याप्रकरणी इसम सुभाष रतनचंद गदिया (रा. रामदिया कॉम्प्लेक्स, कामशेत) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, ३० दिनांक रोजी रात्री ८:३० वाजता पोलिसांनी रामदिया कॉम्प्लेक्स येथे छापा टाकला. तपासणी दरम्यान, मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील पदार्थ बेकायदेशीररीत्या साठवून ठेवल्याचे निदर्शनास आले. मानवी जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असतानाही कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना न करता हा साठा ठेवण्यात आला होता.
पोलिसांनी घटनास्थळी तपासणी करत एकूण ₹८०,३०० किंमतीचा अवैध ज्वलनशील साठा जप्त केला. यात पेट्रोलसदृश आणि रॉकेलसदृश पदार्थ असलेली मोठ्या प्रमाणातील बॅरल्स आणि प्लास्टिक कॅन यांचा समावेश आहे. या प्रकरणी कामशेत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, गु.नं. २९/२०२७ अन्वये भारतीय दंड संहिता कलम २८७ सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९७५ चे कलम ३, ७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शेडगे, सहा. पोलीस उपनिरीक्षक नितेंद्र कदम तसेच पोलीस अंमलदार समीर करे, पोकों , मारकड, पोकों , माळवे, पोकों , गारगोटे, पोकों , ठाकुर, चापोकों रविंद्र राऊळ यांच्या पथकाने केली.
तसेच, या कारवाईत वडगाव मावळ तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक तुषार तनपुरे आणि संदीप तनपुरे यांनीही सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, कामशेत परिसरातील अशा अवैध साठ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page