कामशेत : ( प्रतिनिधी ) शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे घरगुती तसेच व्यावसायिक कामकाजावर मोठा परिणाम होत असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महावितरणच्या कारभाराविरोधात आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे.
बुधवार, दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी शहरातील गणेश मंगल कार्यालयात वीज ग्राहक संघटनेच्या वतीने नागरिकांची बैठक पार पडली. या बैठकीत वीजपुरवठा वारंवार खंडित होणे, वीज बिलामध्ये अनियमितता, देयक दुरुस्तीसाठी वडगावला जावे लागणे, जुनाट खांब व वायरिंगमुळे उद्भवणाऱ्या अडचणी, तसेच कमी-जास्त वोल्टेजमुळे घरगुती उपकरणांचे नुकसान होणे यांसारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत नागरिकांनी विविध मागण्या मांडल्या. विशेषतः शहरातील विद्युत पुरवठा लोणावळा किंवा मुंढावरे येथून सुरू करावा, नागरिकांशी असभ्य वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी, कार्यालयात २४ तास सेवा प्रतिनिधी उपलब्ध असावा, जुनाट खांब व वायरिंग तातडीने बदलण्यात यावेत, तसेच खेड येथील मुख्य कार्यालयाचे मावळ तालुक्यात स्थलांतर करण्यात यावे, अशा मागण्या बैठकीतून पुढे आल्या.
महावितरणच्या दुर्लक्षित कारभाराविरोधात आता ग्रामस्थांनी एकवटलेली भूमिका घेतली आहे. बैठकीत निर्णय घेण्यात आला की, बुधवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून, त्या दिवशी कामशेत शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत.
या बैठकीस सरपंच रुपेश गायकवाड, माजी सरपंच अभिमन्यू शिंदे, कामगार नेते भरतभाई मोरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विलास भटेवरा, तानाजी दाभाडे, निलेश दाभाडे, रोहिदास वांळुज, परेश बरदाडे, विष्णू गायखे, गुलाब तिकोने, सचिन रावळ, राजू लोणकर, अतुल कार्ले, सुरेश जाधव, रमेश सुतार, बाळासाहेब गायखे, तुकाराम गायखे, दत्तात्रय शिंदे, युवराज शिंदे, लक्ष्मण बालगुडे, रमेश लुणावत, भाऊ गायकवाड, कोडिबा रोकडे, सुधीर विर, सतीश इंगवले, विजय दौडे, राजू वेदमुथा, दिलीप पवार यांच्यासह नागरिक आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या या सामूहिक आंदोलनाकडे महावितरण काय भूमिका घेते, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.