Sunday, September 8, 2024
Homeपुणेमावळकार्ला मळवली मार्गावरील इंद्रायणी पुलाचे काम संथ गतीने ,ग्रामस्थांचे जल समाधी आंदोलन…

कार्ला मळवली मार्गावरील इंद्रायणी पुलाचे काम संथ गतीने ,ग्रामस्थांचे जल समाधी आंदोलन…

कार्ला :कार्ला-मळवली रस्त्यावरील इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम पावसाळा सुरू झाला तरीही अद्याप अपूर्णच असून काम संथ गतीने होत आहे. परिणामी संतप्त ग्रामस्थ भाऊसाहेब हुलावळे, संदीप तिकोणे यांनी शुक्रवार दि.14 रोजी थेट नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले.पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या किल्ले लोहगड, विसापूर, भाजे लेणी व धबधबा तसेच कार्ला लेणी आदी ठिकाणांना जोडणारा हा पूल महत्वाचा आहे.
पावसाळ्यापूर्वी तो पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होईल, असे प्रशासनाने सांगितले होते. परंतु, आता पावसाळा सुरू झाला तरीही पुलाचे काम अपूर्ण असून काम संथगतीने सुरू आहे.
नव्या पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी साकव बनविला होता. मात्र,दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात तो वाहून गेला. त्यामुळे मळवली परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला होता. तसेच पावसाळ्यात सुरू झालेला पाऊस थांबेलच असेही नाही. त्यामुळे नवीन पूल वेळेत पूर्ण होऊन वाहतूकीसाठी खुला न झाल्यास अनेक गावांचा संपर्क तुटू शकतो. तर, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळेत आणि पावसाळ्यापूर्वीच पुलाचे काम पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करावा, यासाठी निवेदने दिली.परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
जलआंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपविभागीय अभियंता घ. ह. दराडे यांनी पुलाचे काम 5 जुलैपर्यंत पूर्ण केले जाईल, असे लेखी पत्र दिले. तसेच पर्यायी साकव मार्गाची देखील दुरुस्ती करण्यात येईल, असे अभियंता ज्ञानेश्वर राठोड यांनी सांगितल्यानंतर आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतले.
- Advertisment -

You cannot copy content of this page