लोणावळा – शतकपूर्तीचे औचित्य साधत कैवल्यधाम योग संस्थेच्या वतीने “कर्करोग में योग: व्याप्ति, प्रमाण एवं विकास” या विषयावर आधारित 11वी आंतरराष्ट्रीय परिषद 4 ते 7 डिसेंबर 2024 दरम्यान आयोजित करण्यात आली. ही परिषद आयुष मंत्रालय, इंडियन योगा असोसिएशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.
लोणावळ्यात 1924 साली स्वामी कुवलयानंद यांनी स्थापन केलेली कैवल्यधाम योग संस्था आज आंतरराष्ट्रीय स्तरावर योग शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. 7 ऑक्टोबर 2024 रोजी संस्थेने शतकपूर्ती साजरी केली असून, या शताब्दी वर्षात विविध उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात आले.
परिषदेची सुरुवात 4 डिसेंबर रोजी सहभागी प्रतिनिधींच्या नोंदणीसह झाली. यानंतर “क्वालिटेटिव्ह रिसर्च मेथोडन्स इन योगा” आणि “डिझायनिंग योगा स्टडीज इन कॅन्सर” या दोन महत्त्वाच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या.
5 डिसेंबर रोजी सकाळी महर्षी पतंजलींची पूजाअर्चा आणि शांतीपाठाने उद्घाटन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ. पंकज चतुर्वेदी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. या सोहळ्यात कैवल्यधाम योग संस्थेचे अध्यक्ष डॉ. ओम प्रकाश तिवारी, सचिव व सीईओ सुबोध तिवारी, डॉ. सतबीर खालसा, डॉ. पा. जु. लिन आणि डॉ. के. एस. गोपीनाथ यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कैवल्यधाम संस्थेचा माहितीपट सादर करण्यात आला, तसेच “कर्करोग में योग” या विषयावर माहितीपट दाखवण्यात आला. कर्करोगावर मात करणाऱ्या सुनीता फतरोड यांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रफित दाखवून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
परिषदेत देश-विदेशातील प्रतिनिधींनी ओन्साइट आणि ऑनलाइन सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शनाया वात्सायन यांनी केले.
कैवल्यधाम संस्थेने योग क्षेत्रात आपले योगदान अधिकाधिक व्यापक करण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.