भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) उचित ध्येय गाठण्यासाठी घेतलेली ” प्रेरणादायी झेप ” जीवनात नक्कीच यशस्वी करते , याचे जिवंत उदाहरण कर्जत तालुक्यातील कशेळे येथील पोलीस दलात कार्य करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास मते यांनी दाखवून दिले आहे . आजच्या तरुण पिढीस व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या देशाच्या भावी पिढीस ते खरोखरच एक आदर्श व्यक्तिमत्व ठरणार आहेत.
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना कशेळे गावातील विलास मते यांनी कठोर परिश्रम घेऊन ” कॉन्स्टेबल ते उपविभागीय पोलीस अधिकारी ” या पदापर्यंत घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे . पोलीस खात्यातील इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहचणारा कर्जत तालुक्यातील पहिलाच अधिकारी असल्याने त्यांचा सत्कार कशेळे ग्रामस्थांच्या वतीने नुकताच करण्यात आला.
सत्कारमूर्ती म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी आपला जीवनपट उलगडला , प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेताना काय अडचणी आल्या , आपल्या आईने किती वेळा सौभाग्याचं लेण ” गळ्यातील मणी ” गहाण ठेवले या बद्दल सांगताना त्यांचा गळा दाटून आला , आणि उपस्थितांचे मन हेलावून गेले . दहावी पास झाल्यानंतर कर्जत कॉलेजला जाण्यासाठी ” मुगावकर सर ” यांनी पैसे दिले, म्हात्रे सरांनी फी साठी पैसे दिले , मारुती पाटील शिक्षकाने दोन शर्ट आणि पँट दिल्याबद्दल ची कृतज्ञता त्यांनी बोलून दाखवली . किरवली येथे मावशीकडे सत्तावीस जणांच्या कुटुंबात जे मिळेल ते खाऊन समाधानी राहून ” बी कॉम ” पर्यंतचे शिक्षण घेतले. काही झाले तरी ” पोलीस व्हायचेच ” हे स्वप्न मनाशी बाळगून ध्येयपूर्ती कडे वाटचाल करताना अथक परिश्रम घेऊन स्पर्धा परीक्षा दिल्या.
नोकरी करताना एखाद्या शिकलेल्या मुलावर गुन्हा नोंद होणार असेल तर त्याचे भवितव्य बरबाद होऊ नये , या करिता फिर्यादी आणि आरोपी यांच्यात समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी नोकरी केली तेथे मोठा मित्रपरिवार जमवीला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागात असताना महत्वाच्या ठिकाणी कारवाई करताना वरिष्ठांनी प्रत्येक वेळी आपल्यावर कामगिरी सोपवली आणि ती यशस्वी पार पाडली. नोकरी निमित्त अनेक दिवस घरापासून लांब रहावे लागत असताना पत्नीने मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली म्हणून मी नेहमीच निश्चिंत राहिलो असे गौरोद्गार काढून पत्नीचेही आभार व्यक्त केले . विलास मते यांचे कशेळे गावातील लहानपणीच्या मित्रांनी शैक्षणिक काळात ते घेत असलेल्या मेहनतीचा उल्लेख करून, सगळेच ज्यांना ” साहेब ” बोलतात त्यांचे बालमित्र असल्याचा आम्हाला अभिमान आहे , असे मनोगत व्यक्त केले.
तालुक्यातील पोलीस भरती साठी प्रयत्न करणारी किंवा स्पर्धा परीक्षा देणारी मुले यांना पाहिजे ते मार्गदर्शन करून जास्तीत जास्त मुलांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावे , याच बरोबर पुढील महिन्यात होणाऱ्या पोलीस भरतीत कर्जत तालुक्यातील जास्तीत जास्त मुलांना नोकरी मिळावी , या करिता त्यांना अभ्यासक्रमा व्यतिरिक्त उपयुक्त मार्गदर्शन करणार असून तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा मी हजर राहील असे त्यांनी सांगितले. आपल्या गावच्या ” कर्तृत्ववान सुपुत्राचा ” सत्कार करण्यासाठी कशेळे ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. विलास मते यांच्या सत्कारतून स्फूर्ती घेऊन गावातील अनेक तरुण उज्वल कामगिरी करतील , अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.