पाच लाखाची मागितली होती लाच, लाचलुचपत विभाग रायगड यांनी केली कारवाई..
खोपोली-दत्तात्रय शेडगे
खालापूर दस्तऐवज नोंदणी कामी लाचेचा पहिला हप्ता एक लाख रूपये घेताना खालापूर दुय्यम निबंधक सुरेंद्र शिवराम गुप्ते (वय 53, सध्या रा.कर्जत.मूळ नाशिक) याला लाचलुचपत विभाग रायगड यानी रंगेहाथ पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
बांधकाम व्यावसायिक किशोर बाफना यानी खालापूर तालुक्यात खरिवली व नंदनपाडा भागात जमिन खरेदी केली होती.या जमिनीचे दस्त नोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक गुप्ते यानी पाच लाखाची मागणी बाफना यांचेकडे केली होती. तडजोडी अंती साडेतीन लाख रूपये देण्याचे ठरले होते.
दरम्यान बाफना यानी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर गुप्ते याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला.सोमवारी रात्री चौक फाटा येथे स्वराज्य हाॅटेलमध्ये ठरलेल्या लाचेची रक्कम पैकी एक लाख रूपये स्विकारताना सुरेंद्र गुप्ते याला पकडण्यात आले.हि कारवाई लाचलुचपत विभाग रायगडच्या पोलीस उप अधीक्षक एन सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून पुढील तपास पोलीस निरिक्षक एस गलांडे करित आहेत.
खालापूर येथे निबंधक कार्यालय सुरू झाल्यापासून पाच वर्षात दुसरी कारवाई असून या अगोदर लादे या दुय्यम निबंधकाला पकडण्यात आले होते.त्यानंतर हि दुसरी कारवाई आहे.
आदिवासी जमिनी विक्रीचा मोठा सपाटा सध्या तालुक्यात सुरू असून यामध्ये राजकिय मंडळी आणि प्रशासकिय अधिकारी देखील आघाडीवर असून या रॅकेटचा पर्दाफाश व्हावा अशी मागणी आदिवासी संघटना करत आहेत.