खोपोली : ( श्रावणी कामत ) शहरातील भानवज परिसरात दि. 29 जुलै 2024 रोजी सकाळी वनखात्याचे नितीन कराडे, शितल साळुंखे आणि संतोषी बस्तेवाड हे कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना दाट झुडपा जवळ पक्षांचा किलबिलाट होत असताना दिसला, त्या कारणे त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता तेथे त्यांना अजगर जातीचा साप आढळला. त्याचे शरीरावर जखमा झाल्याने तो मरणासन्न अवस्थेत निपचित पडला होता, मात्र स्पष्ट आणि निरखून पाहिले असता त्याच्या शरीराची किंचितशी हालचाल होताना त्यांना दिसून आल्याने त्यांनी तातडीने ही बाब खालापूर तालुक्याचे वनअधिकारी राजेंद्र पवार आणि वनपाल भगवान दळवी यांना कळवली. त्यांच्य्या सल्ल्यानुसार त्या जखमी अजगराला सुरक्षितपणे सर्पमित्र नितेश उर्फ सोनू पवार यांच्या मदतीने खोपोलीतील वनखात्याच्या कार्यालयात आणले गेले.
पशुवैद्य विष्णू काळे यांनी त्याची तपासणी केल्या नंतर त्याच्या जखमांवर औषध उपचार करून त्याला काही काळ देखरेखीखाली ठेवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अजगराला सर्पमित्र दिनेश ओसवाल, अमोल ठकेकर, नवीन मोरे, अभिजीत घरत, सुकृत गोटस्कर, विजय भोसले यांच्या सहाय्याने गुरुनाथ साठेलकर यांच्या निवासस्थानी सुरक्षीत ठेवण्यात आले. अजगराची वेळेवर देखरेख करणे, त्याला औषधोपचार करणे, त्याचे शरीराची हालचाल करवून घेऊन मसाज करणे, त्याला ऊर्जा मिळावी म्हणून फोर्स फीडिंग अर्थात जबरदस्तीने खाणे भरवणे अशी सेवा करण्यात भक्ती साठेलकर, प्रवीण शेंद्रे व अन्य सर्पमित्रांनी वनअधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोणतेही कसूर ठेवली नाही त्यामुळेच या सर्व घटनाक्रमाचा शेवट अत्यंत गोड झाला.
तो जखमी अजगर तंदुरुस्त होऊन त्याच्या स्वभावधर्मा प्रमाणे आक्रमक झाला होता आणि मुक्त होण्यासाठी अधीर झालेला दिसला. तो संपूर्णतः बरा झाल्याची खात्री झाल्यावर त्याची पुनश्च एकदा वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षित अधिवासात मुक्त करण्यात आले.
वाघ आणि सिंह या प्राण्यांच्या कॅटेगरीमध्ये अजगर जातीचा सरपटणारा जीव गणला जातो आणि तो जैविक साखळीतील अविभाज्य असा घटक असल्याची जाण ठेवून गंभीर जखमी अवस्थेत असलेला आणि शेवटची घटका मोजणाऱ्या अजगराला वाचवण्यासाठी वन अधिकारी, पशुवैद्य आणि सर्प मित्रांनी केलेल्या प्रयत्नांना सलाम करावा लागेल.