लोणावळा(प्रतिनिधी): शहरात गणेशोत्सवाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे.विविध साहित्य, हार, फुलांनी रंगलेल्या बाजारपेठेत गणपती आरास व पूजेचे साहित्य खरेदीसाठी खरेदीदारांनी बाजारपेठ गजबजली.
मागील दोन वर्षानंतर यंदाच्या गणेशोत्सवाचा आनंद व उत्साह नागरिकांमध्ये दिसत आहे. आज सकाळपासूनच लोणावळा बाजारपेठेत नागरिकांनी खरेदी करण्यासाठी गर्दी केली.आज बाजारपेठेत नागरिकांची व वाहनांची मोठया प्रमाणात झुंबड उडाली.यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक देखावे व घरगुती सजावट करून साजरा करत असल्याचे अनेक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले.त्यानुसार सजावटी साठी मोत्यांच्या माळा, कृत्रिम पुष्पाचे हार, फळे व फुले खरेदी करण्यासाठी लोणावळेकर दंग झालेले चित्र सर्वत्र होते.
आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्व् भूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने वाहतुकीचे उत्तम नियोजन लोणावळा शहर पोलीसांकडून करण्यात येत आहे.तरी गणेशोत्सवात शहरातील एकेरी वाहतूक नियमांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून गणेशोत्सव आनंदाने उत्साहात पार पाडावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.