लोणावळा : खंडाळा बाजारपेठ (ता. मावळ) येथील रहिवासी यासीन कादर शेख यांच्या आई मुमताज कादर शेख (वय ७३) यांची डोळ्यांची शस्त्रक्रिया के. बी. हाजी बच्चू आली हॉस्पिटल, परळ (मुंबई) येथे यशस्वीरीत्या व संपूर्ण मोफत करण्यात आली. या शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे १.६० लाख रुपये इतका होता, मात्र झेन फाऊंडेशनच्या माध्यमातून हा संपूर्ण खर्च उचलण्यात आला.
जनसेवक शौकत भाई शेख यांनी पुन्हा एकदा आपली समाजसेवेची बांधिलकी जपत गरजूंना दिलासा दिला आहे. त्यांच्या झेन फाऊंडेशनमार्फत या शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण सहकार्य करण्यात आले. यामध्ये स्वाभिमान मेडिकलचे हेड जाहिद भाई खान यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शौकत भाई शेख हे केवळ नावापुरते जनसेवक नसून, ते प्रत्यक्ष कृतीतून समाजहितासाठी नेहमीच पुढे असतात. यापूर्वीदेखील लोणावळा, खंडाळा परिसरात गरजू रुग्णांसाठी औषधोपचार, शैक्षणिक मदत, अन्नधान्य वाटप अशा विविध माध्यमांतून त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं.
या मदतीबद्दल यासीन शेख व त्यांच्या कुटुंबियांनी शौकत भाई शेख, जाहिद भाई खान तसेच मा. मंत्री नितेश राणे यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. “आपल्यासारखे सेवाभावी व्यक्ती समाजात असणे हीच खरी संपत्ती आहे. आपणास उदंड आयुष्य लाभो आणि आपल्या माध्यमातून गरजूंना अशीच साथ मिळत राहो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.