Monday, November 25, 2024
Homeपुणेतळेगावचाकण येथील फिरंगाई डोंगरावरून पाय घसरून पडल्याने युवक जखमी...

चाकण येथील फिरंगाई डोंगरावरून पाय घसरून पडल्याने युवक जखमी…

तळेगाव( प्रतिनिधी ): मावळ तालुक्यातील फिरंगाई डोंगरावरून पाय घसरून पडल्याने 19 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे . रविवारी सायंकाळी 7:30 च्या सुमारास ही घटना घडली . घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक संस्थेच्या सदस्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत जखमीवर प्रथमोपचार केले व स्ट्रेचरच्या साहाय्याने काळोखात वाट काढत त्याला रुग्णवाहिकेतून दवाखाण्यात दाखल केले .

युदाजीत चक्रवरती ( वय 19,मूळ रा .कोलकाता ) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव असून तो इंदोरी ता . मावळ येथील तोलानीचा विद्यार्थी आहे .

मिळालेल्या माहितीनुसार , नवलाख उंबरे एमआयडीसी जवळील नानोली तर्फे चाकण येथील फिरंगाई डोंगरावर पाय घसरून पडल्याने हा युवक गंभीर झाला होता . कातळ खडकावर पडून घसरत गेल्याने त्याच्या हातांवर व डोक्यावर जखमा झाल्या होत्या . त्याच्या हाताची नखे कापली गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता .

या घटनेची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष निलेश गराडे यांना मिळताच क्षणाचाही विलंब न करता संस्थेचे सदस्य सोबतीला घेऊन त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले . युदाजीत याच्या डोक्याला , दोन्ही हातांना गंभीर इजा झाली होती आणि खूप रक्तस्त्राव झाला होता . अशा परिस्थितीमध्ये लवकरात लवकर त्याला दवाखान्यात दाखल करण्याचे मोठे आव्हान टीम समोर होते.

या सर्व परिस्थितीवर मात करत संस्थेच्या सदस्यांनी जखमीवर प्रथम प्राथमिक उपचार केले . डोंगराच्या पायथ्यापासून रोडपर्यंतचा प्रवास चिखल , चढउतार करत काळोखात गवतातून मार्ग काढत स्ट्रेचरच्या सहाय्याने तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवले आणि तात्काळ सोमाटणे फाट्याजवळील पवना हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले .

सदरची कामगिरी वन्यजीव रक्षक मावळ अध्यक्ष निलेश गराडे , आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमचे अध्यक्ष गणेश निसाळ , गणेश ढोरे , भास्कर माळी , सत्यम सावंत , अविनाश कारले, रौनक खरे , विक्रांत अग्रवाल व इतर सदस्य यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

You cannot copy content of this page