Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडचोरीचा मामला..हळूहळू बोंबला ,रेल्वेच्या ठेकेदाराने केली वीज चोरी !

चोरीचा मामला..हळूहळू बोंबला ,रेल्वेच्या ठेकेदाराने केली वीज चोरी !

कर्जत वीज कंपनीच्या अधिकारी वर्गाचे ठेकेदाराला अभय..

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात विजेशिवाय पत्ता हि हालत नाही , वीज किमती झाली असून ती तुमच्या दारापर्यंत आणायला करोडो रुपये खर्ची होतात . म्हणूनच या विजेची चोरी , गळती , हेराफेरी , मीटरमध्ये फेरफार , घेतली घरासाठी , पण वापरतोय व्यापारी तत्वासाठी , आकडे टाकणे ,अश्या अनेक प्रकारावर लक्ष ठेवून अश्या वीज चोरांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून वापरलेल्या विजेच्या बदल्यात दोन वर्षांची दुप्पट रक्कम वसुली करण्याचा वीज कंपनी नियामक मंडळाने कायदा केलेला असताना कर्जत उपविभागीय कार्यालयातील वीज कंपनीचे अधिकारीच अश्या वीज चोरी करणाऱ्या गुन्हेगारास पाठीशी घालून अभय देत पांघरून घालण्याचे बेकायदेशीर कृत्य करत आहेत.कर्जत रेल्वे स्टेशन जवळच असणाऱ्या किरवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पुलाचीवाडी परिसरात येणाऱ्या व रेल्वे पटरीच्या पलीकडील हद्दीत रेल्वे लोको शेड रेल्वे गाड्या उभ्या रहाण्यासाठी प्लॅटफॉर्मचे काम ठेकेदारी पद्धतीने चालू आहे.
याठिकाणी कामगारांना रहाण्यासाठी शेड देखील ठेकेदाराने बांधून दिले आहेत . येथे काम चालू असताना विजेचा वापर प्रामुख्याने गरजेचा असताना ठेकेदाराने वीज कंपनीकडून कुठल्याही प्रकारचा रितसर कागदपत्रे देऊन मीटर न घेता बेकायदेशीरपणे आकडा टाकून वायर घेऊन वीज चोरी करत असल्याचे येथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी वृत्तपत्रातून बातमी देऊन वीज कंपनी कार्यालय कर्जत येथे तक्रार केली.यावर वीज कंपनी कायदा १३५ यानुसार कारवाई होणे , बंधनकारक असताना वापरलेल्या विजेच्या लोड नुसार २ ते ३ वर्षांचे दुप्पट बिल आकारणे गरजेचे असताना ठेकेदारावर तकलादू कारवाई करून थोड्याच रक्कमेची वसुली केल्याचे निदर्शनास येत आहे.
कर्जत वीज कंपनीचे अधिकारी वर्ग या वीज चोरी प्रकरणात संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सदरची वीज चोरी हि तीन महिन्यांपासून होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.वीज कंपनीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पुलाचीवाडी येथे नवीन रेल्वे लोकोशेड उभारण्याच्या कामी होणारी वीज चोरी हि महावितरण कर्मचारी व अधिकारी वर्गाच्या कळत- नकळत ठेकेदारांकडून मागील तीन महिन्यांपासून वीज चोरी करण्यात येत होती.याबाबतीत या संशयास्पद कामाची माहिती देण्यास कर्जत वीज महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके हे सहकार्य करत नसल्याने या प्रकरणात खूपच गौडबंगाल दडलेले दिसून येत आहे.डिझेल पंपच्या सहाय्याने तेथे काम होत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.मग पुलाचीवाडी एच.टी.पोलपासून काम चालू असलेल्या ठिकाणापर्यंत विजेची वायर कशी फिरवली आहे.
असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.कर्जत तालुक्यात कोरोना काळात वीज बिल भरले नाही म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या घराची वीज विनाविलंब तोडणारे, आकडा टाकला , मीटरमध्ये फेरफार केल्यास वीज चोरी प्रकरणी नियमानुसार सर्वसामान्य नागरिकाला हजारोंचा दंड ठोकणारे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीजचोर ठेकेदाराला पाठीशी का घालत आहेत ? असा सवाल आता या प्रकरणात उपस्थित झाला असून हे प्रकरण वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके , सहाय्यक अभियंता डफळ व या विभागात काम करणारे वायरमन यांच्यावर नक्कीच शेकणार , असे चित्र येथे दिसून येत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page