मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी महाविद्यालयात ग्रंथदिंडी व स्वाक्षरी मोहीम..
लोणावळा: छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यकारभारात मराठी भाषेला अग्रक्रम दिला होता. संत परंपरेपासून ते शिवरायांपर्यंत मराठी भाषेत मोठ्या प्रमाणात ग्रंथनिर्मिती झाली आहे. मराठी भाषेचा इतिहास दोन ते अडीच हजार वर्षांचा असून, तिच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन लोणावळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोणावळा महाविद्यालयाच्या मराठी विभाग, ग्रंथालय विभाग, सांस्कृतिक विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने ग्रंथदिंडी व मराठी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन लोणावळा शिक्षण संस्थेचे विश्वस्त मा. सुनील ठोंबरे यांच्या हस्ते ग्रंथदिंडी पूजनाने झाले.
यावेळी लोणावळा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नारायणभाऊ पाळेकर, परीक्षा विभागप्रमुख व मराठी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र देवरे, डॉ. धनराज पाटील, ग्रंथपाल चांगुणा ठाकर, प्रा. भक्ती अहीर, डॉ. अमर काटकर, डॉ. नितीन बोडके, डॉ. संदीप सोनटक्के, प्रा. भारती देशमुख, प्रा. अनी वर्गीस, डॉ. रंजुबाला चोपडा, प्रा. योगिता मोरे, डॉ. श्रीकांत होगले, वलवण गावच्या पोलीस पाटील अर्चना देशमुख, ग्रामस्थ विलास इंगुळकर, दीपक राक्षे, उल्हास पाळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, “कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे साहित्य विश्वातील योगदान मोलाचे आहे. त्यांच्या जन्मदिनी आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या माध्यमातून मराठी भाषेचा व्यापक प्रसार केला. आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने भविष्यात शिक्षणाच्या सर्व क्षेत्रांत तिचा वापर वाढेल, याचा मोठा फायदा मराठी भाषकांना होईल.”
ग्रामस्थांच्या वतीने नारायणभाऊ पाळेकर यांनी ग्रंथदिंडीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी डॉ. संदीप पोकळे, प्रा. संदीप लबडे, डॉ. पवन शिनगारे, डॉ. मल्हारी नागटिळक, डॉ. दीपक कदम, प्रा. संजय साळुंखे, प्रा. रोहन वर्तक, प्रा. गणेश आखाडे, प्रा. अमोल नवघिरे, प्रा. समीर गायकवाड, प्रा. पल्लवी तिखे, तेजस भांगरे, राकेश साळुंखे, रवींद्र उंबरे तसेच विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा. प्रा. संतोष शिंदे यांनी केले. आभार डॉ. धनराज पाटील यांनी मानले, तर सूत्रसंचालन सहा. प्रा. संदीप खाडे यांनी केले.