Friday, November 22, 2024
Homeपुणेपिंपरी चिंचवडजमिनीच्या वादातून नातेवाईकांवर पिस्तूलने हल्ला करणारे चार आरोपी हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात...

जमिनीच्या वादातून नातेवाईकांवर पिस्तूलने हल्ला करणारे चार आरोपी हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात…

हिंजवडी : जमिनीच्या वादातून नातेवाईकावर गावठी पिस्तुलाने फायर करून जीवघेणा हल्ला करणाऱ्या चार आरोपींना हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाने आठ तासात अटक केली . आरोपींची आणखी कसून चौकशी करत यापूर्वी केलेले 16 गुन्हे उघडकीस आणले . तसेच चोरीला गेलेल्या मालापैकी 8.17 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2 चे पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे यांनी दिली.
विक्की उर्फ विकास रजपूत ( वय 24 , रा . वेणुनगर गणेश मंदिरासमोर , वाकड ) , पृथ्वीराज राठोड ( वय 20 , रा . मु . पो . भोसे , ता . खेड ) , ज्ञानेश्वर उर्फ काळ्या उर्फ शित्रुन राजपुत ( रा . बुद्ध विहार मंदिरासमोर , वाडे बोलाई , ता . हवेली ) , राजु ठाकूर ( वय 20 , रा . आकुर्डी स्टेशन जवळ ) अशी अटक आरोपींची नावे असून,या आरोपींना अवघ्या 8 तासात अटक करण्यात आली आहे.

त्यांच्या विरोधात भा.द.वि कलम 307 , 504 , 506 , 34 सह आर्म ऍक्ट 3/25 सह मुंबई पोलीस कायदा कलम 37 ( 1 ) ( 3 ) 135 अन्वये हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी इशू मारवाडी ( वय 28 , रा . ब्लू डार्ट कंपनीजवळ , शिव कॉलनी , नेरे दत्तवाडी , ता . मुळशी , जि . पुणे ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती .
आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी येशू लुटेरा यांचा पुतण्या विक्की राजपूत याच्या बरोबर वाकड येथील जागेसंदर्भात वाद चालू होते . त्या वादातून विकी राजपूत व त्याच्या साथीदारांनी २० ऑक्टोबर रोजी फिर्यादीच्या घरी येऊन फिर्यादी , त्यांचे चुलते नागु मारवाडी , चुलत भाऊ नितीन मारवाडी व वडील लुटेरा मारवाडी यांना शिवीगाळ केली . तसेच , आरोपी विक्की राजपूत याने फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्याकडील गावठी पिस्तूलने गोळ्या झाडल्या .त्या गोळ्या फिर्यादीच्या हाताला घासून गेल्या व त्यामध्ये फिर्यादी जखमी झाले . ते स्वतःला वाचवण्यासाठी पळून गेले आणि एका ठिकाणी लपल्याने आरोपी विक्की राजपूत याच्या सोबत असलेल्या राजु ठाकूर , पृथ्वीराज राठोड , शित्रुन राजपुत आणि किरण यांनी इतरांवर दगडे मारली . तसेच , विक्की राजपूत याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये गोळी झाडली.
हा गुन्हा घडल्याची माहिती मिळताच , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड अंकुश शिंदे यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनासनुसार या गुन्ह्याचा तात्काळ तपास चालू करून तपास पथकातील अंमलदार यांची दोन पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले . तपासा दरम्यान घटनास्थळावर मिळालेल्या दोन रिकाम्या पुंगळ्या व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले होते .तसेच , नेमलेल्या शोध पथकाने आरोपींचा माग काढण्यासाठी घटनास्थळाच्या आजूबाजूचे तसेच आरोपी मिळून येणाऱ्या संभाव्य ठिकाणाचे एकूण 15 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली . तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना हिंजवडीतून चार आरोपी हे दोन दुचाकी गाडीवरून पळून जात असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली . पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा घडल्यापासून आठ तासाच्या आतच अटक केली .
तपासा दरम्यान अटक आरोपी विक्की राजपूत याच्याकडून फायर केलेली गावठी पिस्तूल व जिवंत चार काडततुसे जप्त करण्यात आली आहेत . तसेच पुण्यात वापरलेल्या मोटरसायकल देखील जप्त करण्यात आल्या आहेत . त्यांच्याकडे कसून केलेल्या तपासा दरम्यान समजले , की 25 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 7:30 वाजता व्यापारी सुनील श्रीकांत कदम ( रा . मलवडी , ता . माण , जि . सातारा ) हे दुकानातील सोन्या चांदीचे दागिने घेऊन दुचाकीवरून जात असताना त्यांना अटक आरोपी पृथ्वीराज राठोड ज्ञानेश्वर उर्फ काळया उर्फ शित्रुन राजपुत , राजु ठाकुर व त्यांच्या इतर दोन साथीदारांनी अडवून गावठी पिस्टलने फायर करून व तलवारीने मारहाण करून त्यांच्याकडील 40 तोळे सोन्याचे दागिने व 30 किलो चांदीची दागिने घेऊन पळून गेले होते . याबाबत त्यांच्याविरुद्ध दहिवडी , पोलीस स्टेशन , सातारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा केल्यापासून हे आरोपी फरार होते व ते पोलिसांना सापडत नव्हते . हिंजवडी पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन तपास केला असता त्यांच्याकडून दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोने व्यापाऱ्यावर टाकलेल्या दरोडाच्या गुन्ह्यातील 9 तोळे 2 ग्रामचे दागिने जप्त करण्यात आले . तसेच वरील आरोपींनी हिंजवडी , निगडी , पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी , जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे असे एकूण 16 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे . त्यातील चोरीस गेलेला एकूण 8.17 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली .
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे , अप्पर पोलीस पोलीस आयुक्त डॉ . संजय संजय शिंदे , डॉ . उपआयुक्त आनंद भोईटे , वाकड विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ . विवेक मुगळीकर , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सुनील दहिफळे , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सोन्याबापु देशमुख , तपास पथकाचे प्रमुख , सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे , पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार , पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे , बापूसाहेब धुमाळ , योगेश शिंदे , कैलास इंगळे , विक्रम कुदळ , अरुण नरळे , चंद्रकांत गडदे , रितेश कोळी , श्रीकांत चव्हाण , कारभारी पालवे , अमर राणे , ओमप्रकाश कांबळे , दत्ता शिंदे , सागर पंडित यांनी केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page