लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेने शहरातील सुशोभीकरण अंतर्गत लोणावळा जयचंद चौक येथे बसविलेले पाण्याचे कारंजे देत आहेत अपघातांना निमंत्रण.
जयचंद चौकात लावलेल्या कारंजाचे पाणी रस्त्यावर पसरत असल्याने याठिकाणी दुचाकी स्वारांचे अपघात होत आहेत.गुरुवार दि.12 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास एक दुचाकी क्र.MH 14 DC 5618 या दुचाकीचा रस्त्यावरील पाण्यात घसरून अपघात झाला व दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात किरकोळ असला तरी याची वेळेत दखल नाही घेतली तर यापुढे या लोकप्रसिद्ध असलेल्या “जयचंद चौकाचे ” अपघात चौकामध्ये रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे.
अनेक वेळा नागरिकांकडून विनंती करूनही याकडे लोणावळा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.या पूर्वी ही याठिकाणी किरकोळ अपघात झाले आहेत. आता जरी किरकोळ अपघात घडत असले तरी पुढे कारंजाच्या पाण्यामुळे एखादी जिवित हाणी झाली तर याला जबाबदार कोण असेल असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. तसेच एखाद्याच्या जिवापेक्षा हे कारंजे एवढे महत्वाचे वाटते का ? या कारंजामुळे जयचंद चौकाला देखणे स्वरूप आले असले तरी प्रशासनाने हे कारंजाचे पाणी रस्त्यावर येणार नाही याचे नियोजन करणे तेवढेच गरजेचे आहे. अशी मागणी लोणावळा वासियांकडून करण्यात येत आहे.