मावळ (प्रतिनिधी):जर्मनीच्या एफइव्ही स्मार्ट मोबीलिटी सेंटर या इंटरनॅशनल कंपनीने मावळ तालुक्यात गेल्या दोन वर्षांपूर्वी 30 जिल्हा परिषद शाळांचे सर्वेक्षण केले होते. त्या सर्वेक्षणात या कंपनीने तीन शाळांची निवड केली त्यात वडगाव येथील केशवनगर मधील जिल्हा परिषद शाळा, कदमवाडी व दानवेवस्ती या तीन जिल्हा परिषद शाळा आहेत.या इंटरनॅशनल कंपनीने या जिल्हा परिषद शाळा दत्तक घेतल्या असून त्या डिजिटल होणार आहेत.
यावेळी जर्मनीच्या एफइव्ही स्मार्ट मोबीलिटी कंपनीचे एच आर हेड स्टीफन ब्रँण्ड, व्हॉइस प्रेसिडेंट युहान च्युव्हाँचर, एच आर मॅनेजर अनुजा सेठी, जि. प. मुख्याध्यापिका सुषमा घोरपडे, जि. प. शिक्षिका छाया जाधव तसेच विद्यार्थी, पालक आणि या कंपनीची संपूर्ण टिम देखील उपस्थित होती.
या कंपनीच्या सीएसआर फंडातून गेल्या काही कालावधीत केशवनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात ब्लॉक बसवणे, फ्लोरिंग बदलणे, वॉल पेंटिंग करणे,बाथरूम दुरुस्ती व वॉटरप्रूफिंग अशी अनेक कामे करण्यात आली आहेत. याशिवाय या कंपनीच्या माध्यमातून यावर्षी या तीनही शाळा डिजिटल करण्यात येणार येईल असा मानस त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी मुख्याध्यापिका सुषमा घोरपडे व शिक्षका छाया जाधव यांनी या मान्यवरांचे आदरपूर्वक स्वागत करत आभार व्यक्त केले.