भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आकुर्डी खंडोबा माळ येथून भव्य मिरवणुकीने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी आज सोमवार दिनांक २२ एप्रिल २०२४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला . यावेळी कर्जत तालुक्यातील महायुतीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे खासदार बारणे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर , आमदार महेंद्र शेठ थोरवे , आमदार प्रशांत ठाकूर , आमदार महेश बालदी तसेच असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. भव्य मिरवणुकीने ढोल ताशांचा गजरात भगव्या टोप्या , फेटे, भगवे झेंडे , धनुष्यबाण चिन्ह, महायुतीतील पक्षांचे झेंडे घेऊन लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीतील महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. ” अब की बार, चार सौ पार ” , ” फिर एक बार, मोदी सरकार ” , ” महायुतीचा विजय असो ” , ” आप्पा बारणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है ” , ” होणार होणार, हॅट्रिक होणार ” या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
मिरवणुकीत खासदार बारणे विजय रथावर आरूढ झाले होते. अनेकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. या निवडणुकीत देखील मताधिक्याचा नवा विक्रम करणार असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे , असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले . यावेळी त्यांचा परिवार त्यांच्या सोबत उपस्थित होता.