मुळशी – आंबवणे येथील ज्येष्ठ समाजसेवक हभप मा. नंदकुमार वाळंज (बाबूजी) यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक तसेच वारकरी संप्रदायासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘विश्व जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
हा मानाचा पुरस्कार त्यांना विश्व सनातन महाराष्ट्र राज्य तत्वावधान महासन्मान संत समिती श्री क्षेत्र संगमेश्वर, जि. ठाणे यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन व दर्शन आशीर्वचन महासन्मान सोहळा या भव्य कार्यक्रमात देण्यात आला.
सोहळ्यात शंकराचार्य स्वामी नारायनानंदतीर्थ, कुंभमेळा समितीचे प. पू. महंत रामनारायणदासजी (नाशिक), काशी विद्वत परिषदेचे आचार्य प. पू. रामनारायणजी द्विवेदी आणि धर्मगुरू स्वामी ओमानंदतीर्थ यांच्यासह 111 संत-महंत आणि धर्मगुरू उपस्थित होते.
या दिमाखदार सोहळ्यात बाबूजी वाळंज यांना संत मंडळींच्या पवित्र हस्ते ‘विश्व जीवन गौरव’ पुरस्काराने गौरवण्यात आले. आपल्या भावना व्यक्त करताना वाळंज म्हणाले, “हिंदू धर्मगुरू आणि संत मंडळींच्या उपस्थितीत हा पुरस्कार मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. हा सोहळा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण राहील. या सन्मानाबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो.”
या पुरस्कारामुळे आंबवणे, मुळशी, मावळ आणि लोणावळा परिसरातील वाळंज यांचे स्नेही व हितचिंतक यांच्याकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.