चाकण (प्रतिनिधी) : मालवाहू टेम्पो रिव्हर्स घेत असताना वडिलांच्याच टेम्पो खाली त्यांचा चार वर्षांचा चिमुरडा मुलगा मागून धावत येत टेम्पोच्या मागील चाकाखाली चिरडून ठार झाल्याचा हृदय पिळवटून टाकणारा अपघात चाकणजवळ मेदनकरवाडी फाटा ते चक्रेश्वर रस्त्यावर मंगळवार दि . 27 रोजी दुपारी घडला .
अतुल इंदल निषाद ( वय 4 वर्ष , रा . मेदनकरवाडी फाटा , चाकण ) असे या अपघातात ठार झालेल्या चिमुरड्या मुलाचे नाव आहे .
मंगळवारी सायंकाळी चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर या बालकाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात घेण्यात आला . चाकण पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती .
मिळालेल्या माहिती नुसार इंदल निषाद हे आपला मालवाहू टेम्पो क्र.( MH 16 AE 2543 ) हा घराजवळून काढून व्यवसायासाठी जात होते . टेम्पो रिव्हर्समध्ये मागे घेत असताना त्यांचाच चिमुरडा मुलगा अतुल टेम्पोच्या मागून धावत आला . त्याच वेळी रिव्हर्समध्ये मागे घेतल्या जाणाऱ्या टेम्पोच्या चाकाखाली चिरडला गेला . त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले . मात्र , उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेने इंदल कुटुंब हादरून गेले असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे . चाकण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती . चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.