मावळ (प्रतिनिधी) : वडगाव शहरातील डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी . सुस्तावलेल्या प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी लवकरात लवकर डेंग्यूच्या डासांचा व साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी करून जनतेला दिलासा द्यावा , अशी मागणी वडगांव शहर भाजपा च्या वतीने निवेदनाद्वारे नगरपंचायतीकडे केली आहे.
वडगाव शहर भाजपाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , वडगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत व त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.या आजाराने थैमान घातलेले असताना देखील नगरपंचायत प्रशासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधी अजूनही ढीम्म असून अद्याप तरी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केल्याचे दिसून येते नाही.
मागील काही दिवसांमध्ये वडगावच्या जनतेला ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले असून आता त्यात डेंग्यूची अधिकची भर पडली आहे . सणासुदीची असलेली सुट्टी मामाच्या गावाला जाण्याआधीच दवाखान्यात घालवावी लागली आहे . त्यामुळे याबाबतच्या गांभीर्याची प्रशासनाला जाणीव देण्यासाठी करून भाजपाने वडगाव मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.यामध्ये डेंग्यूला आळा घालण्या संदर्भात सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला .
यावेळी भाजपा शहराध्यक्ष अनंता कुडे , कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे , संघटन मंत्री किरण भिलारे , भा.यु.मो अध्यक्ष विनायक भेगडे , भा.यु. मो सरचिटणीस अतुल म्हाळसकर , नगरसेवक किरण म्हाळसकर , प्रसिद्धी प्रमुख अमोल ठोंबरे तसेच सरचिटणीस कल्पेश भोंडवे , मकरंद बवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.