कर्जत( सुभाष सोनवणे)ताऊक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यासहित कर्जत नगरीत राहणाऱ्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले असताना कर्जत नगर परिषदेच्या वतीने हे चक्रीवादळ थांबल्यावर नागरिकांना सर्व सोई सुविधा देण्यास अग्रेसर असून विजेची समस्या हटल्यावर सर्व प्रभागात पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांनी दिली आहे.
याबाबत नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार , ताऊक्ते चक्री वादळी वाऱ्यामुळे कर्जत नगर परिषद हद्दी बरोबरच तालुक्यात पडलेली झाडे आणि वीज कंपनीचे वीज प्रवाहाचे अनेक पोल पडल्यामुळे,त्यातच वायरीवर झाडाच्या फांद्या पडत असल्याने वारंवार वीज खंडित होत होती.यामुळे वीज कंपनीचे युद्ध पातळीवर काम चालू होते.तरीही वेळोवेळी वीज खंडित होत असल्याने विजे अभावी पाण्याच्या टाक्या भरण्याचे काम नियोजित वेळेनुसार होत नव्हते.
तरी देखील काल गुंडगे , भिसेगाव , तसेच इतर सर्व प्रभागात थोडा थोडा वेळ पाणी देण्यात आले होते.तर दहिवली विभागात आज सकाळी पाणी सोडण्यात आलेले असून जिकडे पाणी आलेले नाही तिकडे आज प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.व कर्जत शहरात दुपारपर्यंत पाणीपुरवठा होईल.
पालिका हद्दीत सर्व कामे सुरळीत होण्यास दोन दिवस तरी लागतील.तरी सर्व कर्जतकर नागरिकांनी संयमाने घेऊन आलेल्या परिस्थितीशी सामोरे जात कर्जत नगर परिषदेस सहकार्य करावे,व नागरिक सहकार्य करत असल्याने नगराध्यक्षा सौ .सुवर्णा केतन जोशी यांनी नागरिकांचे धन्यवाद व्यक्त केले आहेत .