मावळ (प्रतिनिधी): तालुक्यातील सांगवडे गावातील रोशन जगताप यांच्या घरासमोर शनिवार दि.7 रोजी रात्री हा बिबट्या आढळला. सर्व प्रकार घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हा बिबटया जखमी असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहिती नुसार शनिवार (दि. 7) रोजी रात्री सांगवडे गावात रोशन जगताप यांच्या घरासमोर बिबट्या आढळला. जगताप यांनी घराबाहेर लावलेल्या सीसीटिव्ही मध्ये बिबट्या आल्याचे कैद झाले आहे. बिबट्याने जगताप यांच्या श्वानावर हल्ला केल्याचे दिसत आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी , घटनास्थळी भेट दिली.
सांगवडे गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या तसेच खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर जाऊ नये. परिसरात फटाके फोडून आवाज करावा. बिबट्या आढळल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.