Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळाताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे बुडालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल साडे चार तासाच्या...

ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे बुडालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल साडे चार तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश…

लोणावळा (प्रतिनिधी):ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथील 1200 फूट खोल दरीत असलेल्या पाण्याच्या कुंडात पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाला. ही घटना मंगळवार दि.12 रोजी दुपारी घडली. या तरुणाचा मृतदेह शिवदुर्ग मित्र लोणावळा व वन्यजीव रक्षक संस्था मावळ या संस्थांच्या सदस्यांनी अथक प्रयत्न करून बाहेर काढला.
रोहन विरेश लोणी (वय 21, रा. पुणे. मूळ रा. सोलापूर) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. रोहन लोणी हा मुळचा सोलापूर येथील असून तो शिक्षणासाठी पुण्यात राहत होता.पुणे येथील एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेत तो शिक्षण घेत होता.
मिळालेल्या माहिती नुसार रोहन हा मंगळवारी त्याच्या मित्रांसोबत ताम्हिणी घाटात फिरायला गेला. ताम्हिणी घाटात असलेल्या प्लस व्हॅली येथे सर्व मित्र गेले. निसरड्या दगडी वाटेवर अवघड ठिकाणी 12 फूट खोल असलेल्या एका कुंडात सर्व मित्र पोहण्यासाठी उतरले.कुंडात पोहत असताना रोहन याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
याबाबत पौड पोलिसांनी दुपारी शिवदुर्ग मित्र लोणावळा व वन्यजीव रक्षक संस्था मावळ या संस्थांना माहिती दिली. शिवदुर्ग मित्र लोणावळा व वन्यजीव रक्षक संस्था मावळ या संस्थांचे सचिन गायकवाड, महेश मसने, दिव्येश मुनी,अशोक उंबरे, सुनिल गायकवाड, योगेश उंबरे, प्रिंन्स बैठा, सागर कुंभार, योगेश दळवी, दुर्वेश साठे, अनिल आंद्रे, रमेश कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेतली.आणि अथक प्रयत्न करून दुपारी साडे चार वाजता पोहोचलेल्या पथकाला रोहनचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी तब्बल साडेचार तासांचा वेळ लागला.आपत्ती व्यवस्थापन संस्था मुळशीचे प्रमोद बलकवडे,मानगाव आपत्ती व्यवस्थापनाचे शेलार मामा,पौड पोलीस स्टेशनचे अधिकारी,अंमलदार, वनखात्याचे कर्मचारी, अभयारण्य अधिकारी यांनी मृतदेह बाहेर काढण्यात सहकार्य केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page