Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडतुपगांव - चौक रस्ता चोरी प्रकरणी " वंचित बहुजन आघाडी " आक्रमक...

तुपगांव – चौक रस्ता चोरी प्रकरणी ” वंचित बहुजन आघाडी ” आक्रमक !

आमरण उपोषणाचा जिल्हा महासचिव ” धर्मेंद्र दादा मोरे ” यांचा इशारा…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )सरकारी कामांत ” भ्रष्टाचार ” बोकाळला आहे . या वाढत चाललेल्या घटना संगनमताने घडत असून यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कमालीचे दुर्लक्ष होत असून वर्षानुवर्षे नागरिकांनी मागणी केलेल्या कामांची प्रतिक्षा करावी लागत असताना निधी मंजूर झाल्यावर तो गायब करण्याचा निंदनीय प्रकार घडत आहेत . गेली २५ ते ३० वर्षात खालापूर तालुक्यातील तुपगांव बौद्धवाड्यात कोणताही विकास निधी आला नसताना आमदार निधीतून ७० लाख निधी मंजूर होऊन या मध्ये ६० लाख सभागृहासाठी आणि १० लाख निधी रस्त्याकरिता मंजूर करण्यात आला असताना १० लाख निधीचा रस्ताच झालाच नाही . रस्त्याबरोबरच निधी देखील ” गुल ” झाल्याने या चोरी झाल्याची अजब घटना खालापूर तालुक्यात तुपगांव – चौक याठिकाणी घडली असून तेथील ग्रामपंचायत सदस्य निलेश मोरे यांच्या सतर्कतेमुळे आणि पत्रव्यहारामुळे ही बाब लक्षात येताच सदस्य आणि गावकरी यांनी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड आणि महासचिव धर्मेंद्र दादा मोरे यांच्याकडे हे प्रकरण नेल्याने या प्रकरणाला आता ” आंदोलनात्मक ” वळण लागले आहे.

या बाबतीत वंचित बहुजन आघाडी पक्षांमार्फत या सर्व घटनेचा शोध घेऊन यामध्ये दोषी असलेल्या सर्वांवर ” फौजदारी गुन्हा ” दाखल करून चांगल्या दर्जेचा रस्ता बनवून मिळावा , या मागणी करिता सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडी आणि तुपगांव ग्रामस्थ यांच्या शिष्टमंडळानी उपअभियंता ( बांधकाम ) रायगड जिल्हा परिषद , उपविभाग कर्जत यांच्या कार्यालयाला धडक देऊन आक्रमक पवित्रा घेत झालेल्या प्रकाराचा निषेध आणि संताप व्यक्त करीत दोन दिवसांत सर्व माहिती मिळाली नाही आणि दोषींवर कायदेशीर कार्यवाही केली नाही तर येणाऱ्या काळात वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करीत आपणाला देखील फौजदारी गुन्ह्यात आरोपी करण्यात येईल , असा इशारा वंचित चे जिल्हा महासचिव धर्मेंद्र दादा मोरे यांनी उप अभियंता यांना दिला आहे.

सदर प्रकरणात अधिकाऱ्यांकडून दोषी असणाऱ्यांवर लवकरात लवकर कठोर कार्यवाही करण्यात यावी , जर आपण दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार केलात तर संविधानाच्या माध्यमातून सदर प्रकरणात न्याय मिळविण्याकरिता वंचितच्या माध्यमातून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल , तसेच दोन दिवसात पुरेशी माहिती न मिळाल्यास आपल्या दालनात पुन्हा आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन करण्यात येईल आणि सद्यास्थितीत तिथे कोणा मार्फत ही आणि कोणतंही काम करू नये अशी तंबी देखील यावेळी देण्यात आली . अधिकारी वर्ग यामध्ये लपवालपवी आणि सारवासारवी करताना दिसत असून त्यांच्या कडून मिळालेली माहिती खोटी असल्यास त्याचा परतावा देखील आक्रमकरित्या परत केला जाईल , असा सज्जड इशारा देखील यावेळी अध्यक्ष व महासचिव यांच्याकडून देण्यात आला. नेहमी प्रमाणे बौद्ध वस्तीतच निधी परत जाणे किंवा गिळंकृत करणे , असे प्रकार घडत असून असे प्रकार निंदनीय असून या प्रकारणातुन बरेच प्रकरणे बाहेर येतील आणि त्यात देखील आरोपीना सोडले जाणार नाही , याची दक्षता देखील अधिकारी वर्गाने घेतली पाहिजे अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. त्याचप्रमाणे सदर प्रकरणातून ग्रामस्थाना काही त्रास अथवा इजा झाल्यास वंचितच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल , याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल , असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अध्यक्ष दिपकभाऊ गायकवाड , महासचिव धर्मेंद्र दादा मोरे , ग्रामपंचायत सदस्य निलेश मोरे , लोकेश यादव , आशिष जाधव , प्रवीण भालेराव , पंकज गायकवाड , भगवान बाबरे , रोहित पवार यांच्यासह ग्रामस्थ आणि पत्रकार देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते .
- Advertisment -

You cannot copy content of this page