लोणावळा (प्रतिनिधी): तुमचं लाइट बिल थकलं असल्याचा बहाणा करत, फोन हॅक करत, एका ज्येष्ठ नागरिकाला 97 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार दि.7 रोजी उघडकीस आला. याप्रकरणी रशीद मोहम्मद पंजाबी (रा. वलवण, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पंजाबी यांच्या फोन क्रमांकावर सोमवार दि.2 रोजी तुमचे लाइट बिल थकले आहे, ते तत्काळ भरा,असा फोन आला. त्यावर आम्ही लाइट बिल भरले आहे,असे त्यांना सांगितल्या नंतरसुद्धा संबंधिताने तुमचे बिल थकले आहे,असे सांगत तुम्ही बिल कसे भरता ? अशी विचारणा केली. पंजाबी यांनी बिल गुगल पे द्वारे ऑनलाइन भरतो,असे त्यांना सांगितले त्यावर तुमचे बिल येथे जमा झालेले नाही. तुम्ही बिल कसे भरता याची विचारणा करत गुगल पे वरून बँक खात्याची माहिती मिळवली.
तुम्ही कोणत्या बँकेतून पैसे भरता? असे विचारणा करत तुम्ही शंभर रुपये पाठवून बघा असे सांगितले. दोन वेळा दोन वेगवेगळ्या बँकेमधून प्रत्येकी शंभर रुपये पाठवले असता दोन्ही व्यवहार पूर्ण झाले नाही. खात्यामध्ये पैसे असताना व्यवहार पूर्ण झाला नाही, यासाठी खात्यातील शिल्लक बघितली असता दोन्ही खाती रिकामी झाली असल्याचे निदर्शनास आले. दोन्ही खात्यांमधून एकूण 97 हजार 327 रुपये काढून घेण्यात आले.याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.