Friday, July 4, 2025
Homeपुणेदहिवली - खांडपे - सांडशी निकृष्ट कामामुळे रस्त्यांची दुर्दशा !

दहिवली – खांडपे – सांडशी निकृष्ट कामामुळे रस्त्यांची दुर्दशा !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील अनेक रस्त्यांची निकृष्ट कामामुळे अक्षरशः दुर्दशा झाली आहे . एम एम आर डी ए , सार्वजनिक बांधकाम विभाग तर राजिपच्या बांधकाम विभागाकडून या रस्त्यांची करोडो रुपयांची कामे झाली आहेत . दरवर्षी यावर पुन्हा करोडो रुपयांचा ” तकलादू मुलामा ” लावून नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी होवून ठेकेदारांना ” बोनस रुपी खिरापत ” संबंधित अधिकारी वर्ग वाटतात की काय , असेच काहीसे चित्र येथे असते . त्यामुळे निकृष्ट दर्जाची कामे जाणूनबुजून केली जातात की काय ? असा संशय देखील नागरिकांच्या मनात निर्माण होतो.
ठेकेदार करत असलेल्या रस्त्यांच्या कामांवर जर योग्य वेळीच निरिक्षण व नियंत्रण ठेवल्यास रस्त्यांची होणारी दुरावस्था होणार नाही , म्हणूनच यास जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी वर्गाचा ” बेजबाबदारपणाच ” कारणीभूत असल्याने , अश्या कर्तव्यात कसूर करून ” सहा आकडी पगार ” घेवून नागरिकांना त्रासाला जबाबदार ठरणाऱ्या कामचुकार अधिकारी वर्गावर १५ दिवसांत या दहिवली – खांडपे – सांडशी व तालुक्यातील सर्व रस्त्यांची पाहणी करून कारवाई करण्याची संतप्त मागणी पोलीस मित्र संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष रमेश दादा कदम यांनी निवेदनाद्वारे केली असून अगर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे . त्यामुळे या प्रकरणाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

वास-या चा खोंडा या मार्गावर दहिवली – खांडपे – सांडशी व कर्जत तालुक्यातील या वर्षी नवीन बनवलेले रस्ते निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे खराब झाले आहेत , त्या सर्व निकृष्ठ दर्जाच्या खराब झालेल्या रस्त्यांची १५ दिवसाचे आत पहाणी करुन खराब झालेल्या रस्त्यास ठेकेदारांना जबाबदार न धरता कर्जत तालुक्यातील निकृष्ठ दर्जाच्या कामाची बिले पास करणाऱ्या संबधीत बांधकाम विभागाचे सर्व‌ अधिकाऱ्याना जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येवू नये , असा संतप्त सवाल पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष रमेश दादा कदम यांनी प्रांत अधिकारी व कर्जत तहसीलदार यांना विचारला आहे.
तथापि दहिवली – खांडपे – सांडशी या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत , त्यामुळे वाहन चालकांचा अपघात होऊन प्रसंगी जिवीतहानी व शारिरीकहानी होत असते . तालुक्यातील अनेक रस्ते हे महाराष्ट्र शासन बांधकाम विभागाकडून करोडो रुपये निधी खर्च करून नवीन बनवलेले आहेत , ते खराब झाले असुन मोठ मोठे खड्डे पडले आहेत अक्षरक्षा काही रस्त्यावर वाहन चालवणे कठीण होत आहे , अशामुळे वाहन चालकांचा वेळ , इंधन वाया जात आहे , वाहनांचे नुकसान होत आहे , वाहन चालकांना कमरेचा व मनक्याचा आजार होत आहे . आश्चर्य म्हणजे सिमेन्ट कॉक्रेटच्या रस्त्यांना सुद्धा‌ मोठ मोठ्या भेगा पडलेल्या आहेत.
या संदर्भात तक्रार दाखल झाल्यास तालुक्यातील सर्व नवीन रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे , त्यांच्या कडुन दुरूस्ती करुन घेतली जाईल , असे कारण पुढे करुन कर्जतकर जनतेला ” उल्लु ” बनवुन बांधकाम विभागाचे अधिकारी ” हात वरती ” करताना दिसत आहेत , परंतु रस्त्यांची कामे सुरू असताना रस्त्यावर उभे राहून काम करून घेताना बांधकाम विभागाचे अधिकारी कधी दिसले नाहीत , त्यामुळे रस्त्याची कामे निकृष्ठ दर्जाची झाली व त्यामुळेच तालुक्यातील अनेक रस्ते खराब झाले आहेत , असा आरोप त्यांनी केला असून त्या खराब रस्त्याची जबाबदारी फक्त ठेकेदारांवर अधिकारी ढकलत आहेत हे चुकीचे असुन तालुक्यातील खराब झालेल्या सर्व रस्त्यास संबधीत बांधकाम विभागाचे सर्व‌ अधिकारी हेच जबाबदार आहेत , त्यामुळे तालूक्यातील सर्व नवीन रस्त्याची १५ दिवसात पहाणी करुन खराब झालेल्या रस्त्यास सबंधीत बांधकाम विभागाचे अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी , जर हि कारवाई न झाल्यास १५ दिवसानंतर कोणत्याही क्षणी पोलीस मित्र संघटनेच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल , असा इशारा देण्यात आला आहे.

याबाबतीत त्यांनी पुढील मागण्या केल्या आहेत . १) कर्जत तालुक्यातील नवीन तयार करण्यात आलेल्या सर्व रस्त्यावर पडलेले मोठ मोठे खड्डे १५ दिवसाचे आत भरून सर्व रस्ते दुरुस्त करण्यात यावेत . २) कर्जत तालुक्यात नवीन रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा अपघात होऊन वाहन चालकास जिवीतहानी किंवा शाररिकहानी पोहचल्यास संबंधित प्रशासकिय बांधकाम विभागाचे सर्व‌ अधिकारी‌ यांना जबाबदार धरून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा . ३) कर्जत तालुक्यातील नविन तयार करण्यात आलेल्या सर्व रस्त्याची पाहणी करून रस्त्याची कामे निकृष्ठ दर्जाची झाली असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांची बिले पास करणाऱ्या संबंधित प्रशासकिय बांधकाम विभागाचे सर्व‌ अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी . अशी संतप्त मागणी पोलीस मित्र संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष रमेश दादा कदम यांनी मा. प्रांत अधिकारी अजित नैराळे , कर्जत तहसीलदार शितल रसाळ , सार्वजनिक बांधकाम विभाग व राजिप बांधकाम विभाग कर्जत यांना निवेदनाद्वारे केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page