तळेगाव (प्रतिनिधी): नवविवाहितेने इंद्रायणी नदी पात्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार दिनांक 3 जुलै रोजी इंदोरी येथील पुलाजवळ घडली होती.
प्रज्ञा कौशल भोसले (वय 24 रा. वराळे ता. मावळ जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.प्रज्ञाच्या आत्महत्येचे कारण समोर आले आहे.तीचा मानसिक आणि शारिरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी मृत प्रज्ञाचा पती कौशल पिराजी भोसले (वय 30 रा. तपोधाम कॉलनी, वराळे, ता. मावळ जि. पुणे) यास अटक केली आहे.
मृत विवाहितेच्या आईने या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानुसार पोलिसांनी मृत विवाहितेच्या पतीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी प्रज्ञा हिचा कौशल भोसले याच्या सोबत याच वर्षी दिनांक 11 मे 2023 रोजी विवाह झाला होता. लग्नाच्या 5 ते 6 दिवसानंतरच कौशलने प्रज्ञाकडे दुचाकी, सोन्याची चैन व पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. तसेच हे सर्व माहेराहून आणत नसल्याने तिला जाणूनबुजून रात्रभर पाय दाबून दे वगैरे सांगत मानसिक, शारिरिक छळ करत होता, असे फिर्यादीत नमुद आहे.
मृत विवाहितेच्या घरी अपंग आई, लहान भाऊ असल्याने मुलीने पावणेदोन महिने त्रास सहन केला. मात्र अखेर सोमवारी नवविवाहिता प्रज्ञा हिने इंदोरी जवळील पुलावरुन इंद्रायणी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. वन्यजीव रक्षक मावळच्या सदस्यांनी मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. सहाय्यक पोलिस निरिक्षक मनोजकुमार पांडे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.