भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जत नगर हद्दीत सध्या पाण्याचे नियोजन बिघडले आहे . अनेकांच्या तक्रारीचा सूर असल्याने याबाबतीत शहरातील पाणी योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी माजी नगरसेवक ऍड. संकेत भासे यांच्या पुढाकाराने कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष आढावा बैठकीचे आयोजन आज सोमवार दि. २७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वा. कर्जत नगरपरिषदेत मुख्याधिकारी यांचे दालनात करण्यात आले होते . या बैठकीत कर्जत शहरातील पाणी योजने संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या दरम्यान कर्जतकरांनी पाणी प्रश्नांच्या संदर्भात अनेक सूचना मांडल्या तसेच पाणी योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
या चर्चेत मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्यासह मा. नगरसेवक ऍड. संकेत भासे , प्रवीण गांगल , रमाकांत जाधव , सुदेश देवघरे , प्रसाद डेरवणकर , मोहन भोईर , वैभव सुरावकर , दिनेश कडू , विजय बडेकर , दिलीप बोराडे , शशांक शेट्टी , राकेश शेट्टी , अमोघ कुलकर्णी , दास्ताने काका , पंकज पाटील, विकास चित्ते, मोहन पाठक तसेच कर्जत शहरातील महिलांनी देखील सहभाग घेतला .
आढावा बैठकीनंतर मुख्याधिकारी वैभव गारवे , माजी नगरसेवक संकेत भासे , रमाकांत जाधव, शशांक शेट्टी आणि राहुल गायकवाड यांनी दहिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये जुन्या पाण्याच्या टाकीची पाहणी केली. भविष्यात या ठिकाणी नवीन पाण्याची टाकी उभारता येईल का, याचा अभ्यास करण्यात आला.
मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी कर्जतकरांच्या पाणी समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. कर्जत शहरातील नागरिकांनी वेळोवेळी बैठक घेऊन शहरातील विविध योजनांची माहिती घ्यावी. या उपक्रमामुळे शहरातील समस्या कमी करण्यास मदत होईल , असे ठरविण्यात आले , तर कर्जत नगरपरिषद नागरिकांच्या सहकार्याने शहराच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचे ॲड . संकेत भासे यांनी या प्रसंगी सांगितले .