तळेगाव दाभाडे : येथील नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, तळेगाव दाभाडे येथे शालेय गुणवत्ता वाढ कार्यक्रमाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमात इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसह एन.एम.एम.एस परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा रायटिंग पॅड देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय गोपाळे गुरुजी होते. अध्यक्षीय भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा, समर्थ शलाका परीक्षा व सारथी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने शिष्यवृत्ती मिळवावी यासाठी त्यांनी प्रेरणा दिली.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रशालेच्या प्राचार्या सौ. वासंती काळोखे यांनी केले. शालेय गुणवत्ता वाढ कार्यक्रमाचे आयोजन श्री. दिलीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, त्यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नववीतील ओम निकम आणि रुद्र बोरसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. अर्चना शेडगे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.