खोपोली(दत्तात्रय शेडगे)
नवी मुंबईतील भूमिपुत्र असलेल्या कोळी व आगरी बांधवांच्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या त्यांच्या मासेविक्री परवान्याबाबत काल भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रमेशदादा पाटील तसेच भाजपा मच्छीमार सेलचे अध्यक्ष अॅड. चेतन पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन त्यांना महिलांना परवाने देण्याकरता निवेदन दिले.
सदरच्या निवेदनामध्ये नवी मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम1949 च्या अखत्यारीत कार्य करीत असून कलम 386 प्रमाणे मा. आयुक्तांना मासे विक्री करण्याचे परवाने देण्याचा अधिकार असल्याने येथील स्थानिक भूमिपुत्र असलेल्या सुमारे 850 मच्छी विक्रेत्या बांधवांना व भगिनींना त्वरित परवाने द्यावे अशी मागणी केली. गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबईतील मासे विक्री करणाऱ्या बांधवांचे प्रश्न हे महानगरपालिकेच्या दरबारात प्रलंबितच राहिले आहेत. परंतु तेथील स्थानिक भूमिपुत्र असलेल्या मच्छिमार बांधवांनी भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार रमेशदादा पाटील यांची भेट घेऊन त्या बांधवांना परवाना मिळण्याकरिता लेखी निवेदन व विनंती केली.
त्या अनुषंगाने काल आमदार रमेशदादा
पाटील यांनी नवी मुंबईतील मच्छी विक्रीत्या बांधवांच्या शिष्टमंडळासोबत मा. आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मासे विक्री परवाने हे त्या बांधवांकडे व भगिनींकडे असणे काळाची गरज असल्याने गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी लोकप्रतिनिधींकडे मागणी केली होती परंतु भूमिपुत्रांना कुठल्याच प्रकारे न्याय मिळाला नव्हता. भाजपा मच्छीमार सेलचे अध्यक्ष अॅड. चेतन पाटील यांनी त्या बांधवांनी केलेल्या विनंतीनुसार काल शिष्टमंडळासोबत माननीय आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली.
केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजनांच्या लाभापासून नवी मुंबईतील मासे विक्री करणाऱ्या महिला व पुरुषही अधिकृत मासे विक्री परवाने नसल्याने वंचित राहत होते. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मच्छी विक्री करणाऱ्या अधिकृत परवाने धारकांनाच लाभ मिळणार असल्याने आता नवी मुंबईतील बांधवांना व भगिनींना त्याची उणीव भासू लागली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मच्छीमार बांधवांना परवाने नसतील तर लाभ भेटत नाही.
म्हणून आमदार रमेशदादा पाटील यांना विनंती केली की, बृन्हमुंबई महानगरपालिके मार्फत व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत आपल्या महिला भगिनींना मासे विक्री परवाने काढून देत आहात त्याच धर्तीवर आमच्या नवी मुंबईतील 850 महिलांना त्याचा लाभ द्यावा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ त्यांना घेता येईल. तसेच महिलांनी मा. आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानंतर समाधान व्यक्त केले असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी श्री. धनंजय मुकादम, चंदन मढवी, अरुण वैती, रामकृष्ण तांडेल, जयदीप पाटील, मीनाक्षी पाटील, मिना मढवी, प्रमिला पाटील, प्रेमा पाटील, दीपा नाईक, बेबी पाटील, आनंदी कोळी, उषा पाटील, निमा पाटील, निशा घरात, सुरेखा भोईर उपस्थित होते.