लोणावळा (प्रतिनिधी):राज्य सरकारने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतला. ह्या निर्णयाच्या विरोधात मावळ तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, संघटनांसह आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) वाहतूक आघाडी देखील आक्रमक झाले असून याबाबतचे निवेदन मावळ तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले.
याबाबत बुधवारी सर्वपक्षीय कृती समिती मावळ यांच्याकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. तर दुसरीकडे अनेक पक्ष प्रशासनाला निवेदन देत आपली भुमिका स्पष्ट करत आहे. यातच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) वाहतूक आघाडी यांनीही उडी घेतली असून मावळ तालुक्याचे तहसीलदार यांना याबाबत देण्यात आलेल्या निवेदन पत्राच्या सुरुवातीलाच आरपीआय वाहतूक आघाडीकडून महाराष्ट्र राज्य सरकारने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा अशी मागणी केली आहे.
“मावळ तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या आजपर्यंतच्या संघर्षाला अखेर राज्य सरकारच्या निर्णयामुळे अपयश आले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) वाहतुक आघाडी ही पहिल्यापासून पवना बंद जलवाहिनी विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे आजही आणि यापुढेही उभी आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटची बांधिलकी बांधावरील शेतकऱ्यांशी आहे. या बंदिस्त जलवाहिनीसाठी मावळ तालुक्यातील कित्येक शेतकरयांनी आपले प्राणाचे बलिदान दिले. त्या शेतकऱ्यांचे बलिदान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कदापी व्यर्थ जावू देणार नाही.
राज्य सरकारने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करावा आणि मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना व तमाम मावळवासियांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पश्चिम महाराष्ट्रच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा रस्त्यावर उतरून शेतकरयांना न्याय मिळवून दिल्याशिवाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट स्वस्थ बसणार नाही याची राज्य सरकारने दखल घेऊन हा प्रकल्प कायमस्वरूपी तालुक्यातून हद्दपार करावा.” अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) वाहतुक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख शशिकांत रघुनाथ बेल्हेकर यांनी दिली.