भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)पसायदान हे काव्य जगाच्या पाठीवर तत्त्वज्ञान मांडणारे असून त्यातील सार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेत मांडला आहे. “दुरितांचे तिमिर जावो.. विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो..जो जे वांछिल तो ते लाहो..प्राणिजात।।” हे महान तत्त्वज्ञान संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्या काळच्या कठीण परिस्थितीत संपूर्ण जगाला सांगितले होते.
त्यामुळे भारतीय घटनेचे तत्वज्ञान संत साहित्यात असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी आज खालापूर येथे केले.महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषद यांच्या विद्यमाने १० वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन आज खालापूर तालुक्यातील देवन्हावे येथील नोव्हाटेल इमॅजिका या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते.यावेळी कोरोनाचे नियमांचे तंतोतंत पालन करीत वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील (काकाजी) दिनेश डिंगले, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसिलदार आयुब तांबोळी, सुनील पाटील व वारकरी उपस्थित होते.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा मान यावर्षी रायगड जिल्ह्याला मिळाला असून खालापूर तालुक्यातील देवन्हावे येथील नोव्हाटेल इमॅजिका या ठिकाणी दि. २२ ते २३ जानेवारी २०२२ या दोन दिवसीय संमेलनाची आज सुरुवात झाली आहे.
मी जरी मंत्री असलो तरी माझे कुटुंब हे वारकरी संप्रदायातील असून आम्ही वारकरी विचारातून घडलो आहोत.आपण जे जीवन जगतो ते जीवन जगत असताना त्यात वारकरी विचारांच्या तत्वज्ञानाचे सार असले पाहिजे. मानव धर्म हेच खरे तत्वज्ञान असून तोच आपला विचार, आपले तत्वज्ञान आहे. वारकरी संप्रदाय एक व्यापक तत्वज्ञान आहे. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागले पाहिजे, हीच खरी संतांची शिकवण आहे.
ते पुढे म्हणाले, भारतीय परंपरा समतेच्या पायावर सुरू झाली. त्या काळातील कठीण परिस्थितीत संत ज्ञानेश्वरांनी पसायदान मांडले. संतानी दिलेले विचार हे पुरोगामी चळवळीतील विचार आहेत, ते आपण जोपासले पाहिजे.संत साहित्य हे अनिष्ट सामाजिक वर्तणूकीच्या, अन्यायाच्या विरोधात समाजाच्या उद्धारासाठी उभे ठाकलेले आहे.
यावेळी कर्जत – खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, या ठिकाणी संतांची मांदियाळी अवतरली असून हा परिसर वारकरी संप्रदायाला मानणारा आहे.आज आमच्या भूमीत होणाऱ्या या संमेलनाचा मला सार्थ अभिमान आहे.या संत साहित्याच्या उदघाटन कार्यक्रमप्रसंगी २५ वारकरी दिंड्या सहभागी झाल्या होत्या तर या निमित्ताने महसूल मंत्री श्री.थोरात आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते या दिंड्यांना टाळ-मृदंग-वीणा देवून सन्मानित करण्यात आले.