Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडपाऊस येणार तासभर , लाईट जाणार रातभर , आणि बिल येणार हातभर..

पाऊस येणार तासभर , लाईट जाणार रातभर , आणि बिल येणार हातभर..

कर्जत वीज कंपनीचा कारभार झाला कर्जतकरांना डोईजड , सर्वत्र संताप !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेली वर्षभर कुठलीच कामे न करता दिवस ढकलायचे व पावसाळा जवळ आला की , ” मेंटनन्स ” या गोजिरवाण्या नावाखाली वीज बंद करून वीज धारक ग्राहकांना त्रास द्यायचा , असा हा संतापजनक प्रकार कित्तेक वर्षे वीज कंपनी ग्राहकांशी खेळत आहे . कर्जत तालुक्यात देखील गेली अनेक वर्षे असाच खेळ सुरू असून आता २ महिन्यांपासून वीज खंडित करून नागरिकांचा संताप वाढवत आहेत . इतके असूनही याविरोधात कर्जत तालुक्यातील एकाही राजकीय पक्षाने अथवा कुठल्याही संघटनेने या विरोधात तीव्र आंदोलन छेडले नसल्याने फक्त सोशल मीडियावर वीज कंपनी , त्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तोंड सुख घेताना सर्व दिसत आहेत . त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत ” पाऊस येणार तासभर , लाईट जाणार रातभर , आणि बिल येणार हातभर ” अशी संतापजनक चर्चा कर्जतमध्ये होत आहे.

मार्च एंडीग च्या वीज बिलांची वसुली झाल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची ” शाबासकी ” मिळाल्यावर आरामात बसलेली वीज कंपनीची यंत्रणा मे महिन्यात लाईट घालवून झाड तोडणी सुरू करतात , पण थोड्याशा अवधीत ती पूर्ण होत नसल्यामुळे जून महिन्यात ” पाऊस – वारा ” सुरू झाल्यावर विजेच्या तारा , वायर तुटल्याची घटना वारंवार होते . आणि हा फॉल्ट काढण्यासाठी दिवसभर वीज घालवली जाते . ठेकेदार करत असलेल्या कामांचा ” मलिदा ” खाण्यात अधिकारी वर्ग ” गुंग ” असल्याने पोल किती खोल खणले आहेत , याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते .यामुळे हे पोल लगेच पडून वीज खंडित होण्याचे प्रकार देखील मागील २ महिन्यात घडले आहेत . मात्र यामुळे नागरिकांना याचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे.

आता तर शाळेच्या ” एडमिशन ” सुरू असून त्यांना लागणारे शासकीय दाखले योग्य वेळी देण्याची गरज असून देखील वीज वारंवार खंडित होत असल्याने याचा परिणाम , दाखले वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. विजे अभावी पाणी येत नाही त्यामुळे महिलांचा संताप वाढला आहे , वीजे अभावी रुग्णालयात देखील रुग्णांना मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे , जेष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होत आहे , कॉम्प्युटर वर होणारी कामे खोळंबली जात असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची कामे होत नाहीत , बँकेची व्यवहारे थांबली जात आहेत , नवजात बालकांना वीज नसल्याने झोप येत नसल्याने त्यांचाही जीव कासावीस होत आहे , या सर्वांचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होत असल्याने नागरिकांचा , महिलांचा वीज कंपनीवर संताप खदखदत आहे.

कर्जत वीज कंपनीच्या दुकानात १ उपकार्यकारी अभियंता , ८ सहाय्यक अभियंता , १ कार्यालय अभियंता , कॉम्प्युटर चालवून काम करणारे क्लार्क व शेकडो कामगार असूनही वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याने ग्राहकांच्या जीवावर पाच आकडी पगार घेणारे हि ” मस्तवाल यंत्रणा ” नक्की काय काम करते ? याचे उत्तर मात्र गुलदस्त्यात बंद आहे . सब स्टेशनला वीज बंद करण्याचे आदेश कोण देते ? हा ही एक ” संशोधनाचाच ” विषय आहे . तरी वीज कंपनीने आपला कारभार सुधारावा , अन्यथा तीव्र आंदोलन छेडून , आपले दुकान बंद करून , येथून हद्दपार व्हा , असे संतापजनक मत ” छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने ” व ” स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या ” वतीने व्यक्त केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page