तळेगाव दाभाडे : पुणे – लोणावळा लोकलमध्ये चोरी करून पळ काढणाऱ्या चोरास रंगेहाथ पकडण्यास दामिनी पथकाच्या दोन महिला अंमलदारानां यश आले.ही कारवाई रविवारी दि.24 रोजी सायंकाळच्या सुमारास तळेगाव स्टेशन येथे करण्यात आली.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोर पकडणाऱ्या त्या दोन्ही महिला खडकी मुख्यालयातील पोलीस अंमलदार होत्या.पुणे लोणावळा लोकलमध्ये चिंचवडपासून अनेक प्रवाशांचे पाकीट तसेच इतर मौल्यवान वस्तू चोरत चोरत तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवर लोकल हळू होताच तो पळ काढू लागला . यावेळी प्रवाशांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला . त्याचवेळी खडकी मुख्यालयातील दामिनी पथकात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस अंमलदार संतोषी ढेंबरे व रूपाली नरळे यांनी त्याला पाहताच त्याचा पाठलाग करून मुद्देमाला सहित रंगेहात पकडले .
दामिनी पथकातील संतोषी ढेंबरे व महिला पोलीस अंमलदार रूपाली नरळे या पुणे ते लोणावळा लोकलमध्ये पेट्रोलिंग करत असताना खडकीपासून महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या एका आरोपीचा पाठलाग करत होत्या . मात्र तो त्यांना चकवा देत इतर डब्यातून पळून जाण्यास यशस्वी झाला . त्यावेळेस त्या तळेगाव स्टेशन येथे उतरल्या असता तेथे समोर असा प्रकार पाहिला . त्यावेळी त्यांनी त्वरित जाऊन शिताफिने या चोरट्यास पकडले . त्यानंतर पुणे येथे नेमणुकिस असणारे पोलीस वसंत कुटे यांच्या सहकार्याने सदर चोरट्यास तळेगाव रेल्वे स्टेशन येथे नेण्यात आले . त्यावेळेस तेथे उपस्थित असणाऱ्या प्रवाशांनी सिंघम महिला दामिनी पथकातील अंमलदाराचे टाळ्या वाजवून स्वागत केले.
सध्या कोरोनानंतर पुणे – लोणावळा लोकल येथे प्रवाशांची गर्दी वाढत आहे . मात्र तळेगाव वडगाव व देहूरोडपर्यंत अपुरी कर्मचारी संख्या असल्याने व काही अपघात घडल्यास मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याचे तेथील प्रवाशांचे म्हणणे आहे . यावर रेल्वे प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करून लोकल भरते वेळेस सुटते वेळेस पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून यावेळी करण्यात आली आहे.