Wednesday, July 2, 2025
Homeमहाराष्ट्ररायगड" पेण अर्बन बँक प्रकरणी " रमेश दादा कदम यांच्या उपोषणाला यश...

” पेण अर्बन बँक प्रकरणी ” रमेश दादा कदम यांच्या उपोषणाला यश !

ईडी च्या हस्तक्षेपामुळे ७ वर्षे वाया , सुप्रीम कोर्टात माघार

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )” गल्ली ते दिल्लीत ” भ्रष्टाचार प्रकरणी कुप्रसिद्ध झालेल्या ” पेण अर्बन बँक घोटाळा ” प्रकरणात ” घेणं नाही देणं ” अस असताना ” ईडी ” ने सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप केल्याने न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा येवून गेली १४ वर्षे लढा देत असलेल्या पेण अर्बन बँक संघर्ष समिती व ठेवीदारांना अद्यापी न्याय मिळू शकला नव्हता . १ लाख ५८ हजार ठेवीदारांची ७५० करोड रुपयांची मेहनतीची पूंजी बँकेच्या संचालक मंडळाने गळींकृत केली होती . या विरोधात नुकतेच कर्जत तालुक्यात ” पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम ” यांनी आमरण उपोषण करून आरपार ची लढाई लढली होती . या उपोषणात त्यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना देखील धारेवर धरून मा. न्यायालयाने दिलेल्या प्रत्येक महिन्यात बैठक आयोजित करा , व त्याचा अहवाल आम्हाला सादर करा , या आदेशाला न जुमानल्या प्रकरणी रायगड जिल्हाधिकारी यांची तक्रार करून कारवाईची मागणी केली असता , आत्ता या प्रकरणात त्यांच्या आंदोलनाला यश आले असून , ईडी ने सुप्रीम कोर्टात माघार घेतली असल्याने आता ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळण्यास मार्ग सुकर झाला आहे .

पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी यापूर्वी मे २०१६ मध्ये ते भाजप युवा मोर्चा कर्जत तालुका अध्यक्ष असताना पेण अर्बन बँक बद्दल कर्जत पालिकेच्या निवडणूक प्रचारा दरम्यान तत्कालीन भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी येथे पेण अर्बन बँक , आमची राज्यात व देशात सत्ता आल्यावर सुरू करून त्याचे पैसे सर्वांना मिळतील , असा शब्द दिला होता , त्याची आठवण करून दिल्यामुळे त्यांची रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी पक्षातून गच्छंती केली होती . तरीही ते न डगमगता आजपर्यंत ठेवीदारांसाठी लढत देत आहेत . ३० सप्टेंबर २०२४ रोजी रमेश दादा कदम यांनी ” आमरण उपोषण ” व आपला प्राण विष प्राशन करून ” आत्मदहन ” करणार , हे आंदोलन छेडले असता या आंदोलनाचा आवाज थेट मंत्रालयात व दिल्ली पर्यंत पोहचला होता . म्हणूनच की काय , मा. सुप्रीम कोर्टाने ईडी ला विचारणा करून या बँक घोटाळा प्रकरणात तुमचा हस्तक्षेप कसा ? यामध्ये ईडी चे कुठलेच निकष लागत नसल्याने , ते सुप्रीम कोर्टाला काहीच विश्लेषण देवू शकले नाहीत , मात्र या ईडी च्या स्टे व हस्तक्षेपामुळे नाहक ७ वर्षे वाया गेली असून , याला जबाबदार कोण ? असा प्रश्न पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी उपस्थित केला असून , या ईडी वरच आता केस करण्याची गरज व तशी मागणी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे .

ईडी ने सुप्रीम कोर्टात माघार घेतली असल्याने आता ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळण्यास मार्ग सुकर झाला असून , नुकतेच पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी केलेल्या प्राणांतिक आमरण उपोषणाचा हा ” रेटा ” असून त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून याचे श्रेय नक्कीच पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ” रमेश दादा कदम ” यांना जाते , हि काळया दगडावरची रेघ म्हणावी लागेल .
- Advertisment -

You cannot copy content of this page