मावळ (प्रतिनिधी): तळेगाव दाभाडे परिसरात राहणाऱ्या एका किराणा व्यापाऱ्याच्या घरात घुसून भरदिवसा दरोडा टाकण्यात आला आहे. पिस्तूल व चाकुचा धाक दाखवून दरोडेखोरांनी तब्बल साडेतीन लाखांची रोकड तसेच सोन्या चांदीचे दागिने असा एकूण साडेदहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. हि घटना मंगळवार दि.10 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे काढणाऱ्या आणखी एका घटनेने आज तळेगाव शहरासह संपूर्ण मावळ तालुका पुन्हा एकदा हादरलं आहे. याबाबत दिलीप चंपालाल मुथा (वय 55, रा. तळेगाव दाभाडे जि. पुणे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरीष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे वडगाव मावळ येथे किराणा दुकान आहे. ते त्यांच्या पत्नीसह वडगाव येथे किराणा दुकानात गेले होते.जेवण करण्यासाठी ते दोघेही तळेगाव दाभाडे येथील घरी 2 वाजण्याच्या सुमारास परत आले. त्यावेळी घरात त्यांच्या दोन मुली होत्या. त्याचवेळी चेहऱ्याला मास्क लावलेले चार-पाच अनोळखी इसम घरात घुसले.त्यांनी मुथा यांच्या कुटुंबियांना चाकुसह बंदुकीचा धाक दाखवत मुथा यांच्या घरातील तीन ते साडेतीन लाखांची रोकड आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह साडे दहा लाखाचा ऐवज लुटून दरोडेखोरांनी तेथून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच या आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
तळेगाव परिसरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. भर दिवसा घडलेले ह्या दरोडाच्या घटनेने शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवल जात आहे. दरोडेखोरांनी भर दिवसा दरोडा टाकून पोलिसांना खुले आवाहन दिल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी करीत आहेत.